"कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल"
सांगलीचे एसपी संदीप घुगे यांनी सराईत गुन्हेगारांना दिला सज्जड दम
सांगली : खरा पंचनामा
कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी कृत्ये न करता कामधंदा करा. गुन्हेगारी कोठे होत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्या. कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल असा सज्जड दम सांगलीचे एसपी संदीप घुगे यांनी बुधवारी सराईत गुन्हेगारांना दिला.
सांगली जिल्ह्यात वारंवार होत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर मोका, खुन, खुनाचा प्रयत्न, अंमली पदार्थ, शस्त्र अधिनिमय, तडीपारी पूर्ण झालेले अशा गंभीर गुन्ह्यातील 306 सराईत गुन्हेगारांना पोलिस मुख्यालयात बोलावण्यात आले होते. यावेळी दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची पोलिस अधीक्षकांनी चांगलीच झाडाझडती घेतली.
त्यांच्या हातून पुन्हा गुन्हा घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी घुगे यांनी दिला. जिल्ह्यात वारंवार खून व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. गेल्या वर्षभरात साठहून अधिक खून झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सराईत असणारे गुन्हेगार, जामिनावर बाहेर असणाऱ्या गुन्हेगारांची पोलिस अधीक्षक घुगे यांनी आज झाडाझडती घेतली. यावेळी सांगली 51, मिरज 47, ईश्वरपूर 50, तासगाव 42, विटा 46, जत 70 अशा एकूण 306 गुन्हेगारांना पोलीस मुख्यालयात बोलवण्यात आले होते. यावेळी भविष्यात कोणतीही गुन्हा करू नये, तसेच कोणत्याही गुन्ह्यात सहभागी देखील होऊ नये, अशी सक्त सूचना त्यांना देण्यात आली. कुणासारख्या व शस्त्र अधिनियमांसारख्या गंभीर गुन्ह्यात सहभाग आढळून आल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, सांगलीचे उपाधीक्षक संदीप भागवत, मिरजेचे उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, तासगावचे उपाधीक्षक अशोक भवड, उपविभागीय पोलीस अधिकारी, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, सर्व पोलीस ठण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस ठाण्याचे डी. बी. पथकाचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.