Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघं एकच आहोत"

"कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघं एकच आहोत"

कोल्हापूर : खरा पंचनामा

मतदार याद्या सदोष असल्याचा धोशा गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विरोधकांनी लावला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर आरोपांचे मोहोळ हुलवले. त्यानंतर महाविकास आघाडी, मनसे, डावे, शेतकरी पक्षाने मतदार याद्यांमधील दुबार, तिबार नावावर आक्षेप घेतला.

मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका न घेण्याचे आवाहन केले. काल दंड बैठका मारल्यानंतर विरोधकांची केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी भेट घेतली. पण त्यांच्यातील संवाद फसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून समोर आले. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेला कडाडून विरोध केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी रेटली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी विरोधकांना फटकारले आहेत.

"निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ. तिनही पक्ष आप आपल्या परीने त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील. पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघं एकच आहोत. कुठं युती झाली नाही तरी आमची पोस्टपन युती होईल. त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकंच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देतील." असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीनही पक्ष एकत्रित लढतील की नाही याप्रश्नावर स्पष्ट मत मांडलं.

उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी 'दगाबाजरे' अशी सरकारविरोधात मोहीम आरंभली. कर्जमाफीतर दूरच पण मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदतही मिळाली नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बाहेर पडल्याचा मला आनंद असल्याचा चिमटा त्यांनी काढला. उद्धव ठाकरे हे टोमणे मारण्याच्या पलिकडे काहीच करू शकत नाही. विकासावर त्यांचे एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असा टोलाही त्यांनी लगावला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. त्यावर आणि सरकारविरोधातील उद्धव ठाकरेंच्या संवाद दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. निवडणुका पुढे ढकलाव्यात असेच अपेक्षित उत्तर उद्धव ठाकरे यांना हवे आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलणे अशक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.