Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'पुन्हा एकदा उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद !'

'पुन्हा एकदा उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद !'

अकोला : खरा पंचनामा

कुठलीही निवडणूक म्हटली की प्रमुख पक्षांकडून निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांची गर्दी असते. त्यातील एकाला संधी मिळाल्यावर पक्षांतर्गत नाराजी नाट्य रंगणे काही नवीन नाही. वाशीममध्ये मात्र, एका इच्छुकाची उमेदवारी कापल्याने खमंग राजकीय चर्चा होत आहे. पदाधिकाऱ्याने मुख्य चौकात थेट बॅनर लावून मनातील खदखद व्यक्त करीत प्रमुख नेते व पक्षाचे वाभाडेच काढले.

वाशीम येथील भाजपच्या अभियंता सेलचे पदाधिकारी धनंजय घुगे यांनी हे पाऊल उलचलले. 'पुन्हा एकदा उमेदवारी कापणाऱ्यांचे, धन्यवाद!, असे ठळक अक्षरात नमुद करून एकनिष्ठ कार्यकर्ता कायम राहील. पद व सत्तेसाठी हपापलेला नाही, हे दर्शवण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल देखील आभार,' असा जोरदार टोला सुद्धा लगावला आहे. भाजपांतर्गत नाराजी, तिकीट वाटपातील घोळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा मुहूर्त निघाला अन् नगर पालिका व नगर पंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला. अनेक वर्षांपासून इच्छुकांना स्थानिक निवडणुकीची प्रतीक्षा लागली होती. इच्छुकांनी त्यासाठी तयारी देखील केली होती. निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारी नाट्य सुरू होते.

उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी व अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता अंतर्गत नाराजीचा दुसरा अंक सुरू झाला. वाशीम नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी धनंजय घुगे यांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. यामुळे त्यांनी नाराज होत थेट शहरातील मुख्य भागात बॅनर लावून स्थानिक नेते व पक्षावर निशाणा साधला आहे. आपली उमेदवारी कापल्याबद्दल त्यांनी संबंधितांचे आभार मानले.

धनंजय घुगे यांनी आपल्या बॅनरवर म्हटले आहे की, 'स्वाभिमानी योद्धा, निष्ठावंत मावळा. पुन्हा एकदा माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद ! कारण, २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत माझी उमेदवारी डावलली, २०१६ मध्ये नगर पालिकेची उमेदवारी डावलली, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलली, २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलली आणि आता पुन्हा नगर पालिकेच्या निवडणुकीत माझी उमेदवारी कापली. तरीही मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि कायम राहील. पद व सत्तेसाठी मी हपापलेला नाही हे दर्शवून देण्याची संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद.'

धनंजय घुगे यांनी बॅनर लावण्यामागील भूमिका स्पष्ट केली. 'मला उमेदवारी नाकारल्यानंतर माझ्याविषयी माझ्या प्रभागात अनेक अफवा पसरत होत्या. पक्षाने मला उमेदवारी नाकारली आणि ती नाकारल्यामुळे मी पक्षांतर करेल किंवा पक्षविरोधी काम करेल, अशी चर्चा होत होती. तसे काहीही नाही हे स्पष्ट करण्यासाठी बॅनर लावले,' असे त्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.