Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस दलाला आता गुप्तचर संकलनाचे व्यावसायिक प्रशिक्षण !

पोलीस दलाला आता गुप्तचर संकलनाचे व्यावसायिक प्रशिक्षण !

मुंबई : खरा पंचनामा

मुंबई पोलीस दलातील विशेष शाखा विभाग तसेच पोलीस ठाण्यातील दहशतवादविरोधी विभागातील अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती कशी संकलित करावी, याचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने केंद्रीय गुप्तचर यंत्रणेतील सेवानिवृत्ती अधिकाऱ्यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सेवानिवृत्त झालेल्या उपायुक्त पातळीवरील अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

केंद्रीय पातळीवर देशात इंटेलिजन्स ब्युरो (गुप्तचर विभाग) तर देशाबाहेर रिसर्च अनालायसिस विंग (रॉ) कार्यरत आहे. या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळविलेल्या गुप्तचर यंत्रणातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून राज्यातील गुप्तचर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. आता मुंबईतील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी विद्यमान पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी प्रयत्न सुरु केले होते. मुंबई पोलिसांची विशेष शाखा हे शोभेपुरते न राहता दहशतवादी कारवायांसह इतर सर्व प्रकारची माहिती संकलित करण्यात वाकबगार व्हावी, यासाठी भारती यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख व पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी मुंबई पोलीस दलात कायदा व सुव्यवस्था या विभागाचे सहआयुक्त असताना प्रत्येक पोलीस ठाण्यात दहशतवादविरोधी पथक स्थापन केले होते. परंतु हे पथक प्रशिक्षण नसल्यामुळे नेमके काय काम करते हे गुलदस्त्यात होते. आता या पथकातील अधिकाऱ्यांना गुप्त माहिती संकलित करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आतापर्यंत राज्यातील गुप्तचर विभागात पोलीस दलातील अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात होती. याकडे साईड पोस्टिंग म्हणून पाहणारे हे अधिकारी नियुक्तीची तीन वर्षे पूर्ण झाली की बदलीसाठी प्रयत्न करीत असत. प्रत्यक्षात गुप्तचर संकलनाचे काम काहीच करीत नसत. शहर पोलिस दलातील विशेष शाखेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचीही तीच मानसिकता झाली होती. यावर उपाय म्हणून गृहविभागाने थेट गुप्तचर अधिकारी म्हणून भरती करण्याचे ठरविले. अशा प्रशिक्षित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर गुप्त माहिती संकलनात चांगलीच भर पडली होती.

अशा वेळी आता मुंबई पोलीस दलातील विशेष शाखा तसेच दहशतवादविरोधी पथकातील सर्वच अधिकाऱ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार केंद्रीय गुप्तचर विभागातील निवृत्त उपायुक्त हणमंत बापट यांची राज्य पोलीस दलाने नियुक्ती केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.