अजित पवारांच्या बनावट लेटरपॅडद्वारे विकास कामं मंजूर करण्याचा प्रयत्न करणारा मास्टरमाइंड सापडला
बीड : खरा पंचनामा
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बनावट लेटरपॅडवर खोटी स्वाक्षरी करून जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल एक कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील अशोक वाघमारे याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
वाघमारे याने अजित पवार यांच्या नावाने तयार केलेले हे बनावट पत्र जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाणे यांना दिले. त्यानंतर काही दिवसांनी वाघमारे थेट मुंबईतील उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचला आणि 'पत्रावर अजून कार्यवाही झाली नाही,' अशी तक्रार केली. त्यामुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांना संशय आला. तपासात हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर वाघमारेवर बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या पत्रामध्ये लहामेवाडी गावातील विविध विभागांत प्रत्येकी दहा लाख रुपयांची एकूण दहा कामांचा समावेश आहे. जसे की एलईडी पथदिवे, पेव्हर ब्लॉक आदी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर करावीत, अशी मागणी करण्यात आली होती.
या प्रकारामागे वाघमारे एकटाच नसून त्यालाही कोणीतरी ठगवले असावे, असा संशय अधिकाऱ्यांना आहे. जर स्वतः वाघमारेनेच हे बनावट पत्र तयार केले असते, तर तो केवळ जिल्हा नियोजन समितीपुरताच विषय ठेवला असता. मात्र, त्याने थेट उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबई कार्यालयात भेट दिल्याने त्याला एखाद्या व्यक्तीने 'पालकमंत्र्यांकडून कामे मंजूर करून देतो' असे सांगून फसवले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. वाघमारे हे निवृत्त शिक्षक असून त्यांची पत्नी लहामेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.