किराणा दुकानदाराचा डोक्यात दांडके घालून निर्घृण खून : कारण अस्पष्ट
डुबल धुळगाव येथील घटना : पूर्व वैमनस्याची शक्यता, तीन ते चार संशयित ताब्यात
तासगाव : खरा पंचनामा
तासगाव तालुक्यातील डुबल धुळगाव येथे एका किराणा दुकानदाराचा डोक्यात लाकडी दांडके घालून तसेच धारदार शस्त्राने वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. बुधवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान ही घटना घडली. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान याप्रकरणी एलसीबीने तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.
राजेंद्र गौतम खांडे (वय 39) असे मृताचे नाव आहे. खांडे यांचे किराणा माल विक्रीचे दुकान असून ते पत्नी, दोन मुली, भावांसमवेत डुबल धुळगाव येथे राहतात. गुरुवारी दुपारी ते शेतात गेले होते. तीन ते चारच्या सुमारास अज्ञात चार ते पाच जणांनी त्यांच्यावर शेताजवळील रस्त्यातच हल्ला केला. लाकडी दांडके तसेच धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यात वार करण्यात आले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर तेथून पळून गेले.
दुपारी चारच्या सुमारास काहींनी याची माहिती तासगाव पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने पोलीस अधीक्षक संदीप घुगे, तासगावचे उपाधीक्षक अशोक भवड, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, तासगावचे प्रभारी पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान एलसीबीने चार ते पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून लवकरच या खुनाचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.