Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या पोलीस तक्रार घेत नसल्याने मुलीचा आक्रोष

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या 
पोलीस तक्रार घेत नसल्याने मुलीचा आक्रोष

सोलापूर : खरा पंचनामा

बार्शी तालुक्यात ग्रामसेवकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, मृत ग्रामसेवकाच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी पोलिसांत धाव घेतली आहे.

मात्र, पोलिसांनी "गुन्हा तात्काळ दाखल करता येत नाही" असे सांगत कुटुंबीयांना रितसर जबाब नोंदवण्याचे सांगितले. त्यामुळे बार्शी ग्रामीण रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

प्रकाश बाविस्कर असे आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. कुटुंबीयांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातत्याने मानसिक छळ केल्याचा, दप्तर तपासणीच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या त्रासाला कंटाळून बाविस्कर यांनी 19 नोव्हेंबर रोजी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. घरातील सदस्यांना खोलीत खुर्ची आदळल्याचा आवाज आल्याने पत्नीने तातडीने धाव घेतली व त्यांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. काही दिवस उपचार सुरू असताना 26 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

प्रकाश बाविस्कर यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. "जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही," असा ठाम पवित्रा घेतल्याने रुग्णालयात मोठी गर्दी झाली. कुटुंबीय रुग्णालयात ठिय्या देऊन बसले असून पोलिस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी "सध्या गुन्हा दाखल करता येणार नाही, प्रथम कुटुंबीयांचा जबाब नोंदवावा लागेल," असे सांगितले. मात्र, कुटुंबीय मात्र गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम राहिले आहेत.

प्रकाश बाविस्कर यांचे पार्थिव पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण पोस्टमार्टम करण्यापूर्वीही कुटुंबीयांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या संतापात आणखी भर पडली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बार्शी ग्रामीण रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबीयांचा ठाम पवित्रा पाहता प्रशासन आणि पोलिसांवर दबाव वाढला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.