खंडणी, अपहरणप्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज लोहार यांना जन्मठेप
जळगाव : खरा पंचनामा
तक्रार अर्जावर चौकशी करण्याच्या बहाण्याने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांचे अपहरण करून 25 लाख रुपये खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणारे मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक व चाळीसगावचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार (45) व धीरज येवले (47) या दोघांना न्यायालयाने शनिवारी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दुर्मिळातील दुर्मीळ घटना नसली तरी या दोघांनी केलेल्या कृत्यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवला. शिक्षा ठोठावल्यानंतर दोघांचीही जळगावच्या उपकारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विश्वासराव रावसाहेब निंबाळकर (59) यांना संशयाचा फायदा देत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
चाळीसगाव येथील डॉ. उत्तमराव धनाजी महाजन (वय-62) यांच्याकडून 25 लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी त्यांचे अपहरण करून 18 तास डांबून ठेवल्याच्या कलमांखाली तिघांवर चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. बांधकाम ठेकेदारांनी महाजन यांच्याविरुद्ध फसवणुकीचा तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावर चौकशी करण्याच्या बहाण्याने लोहार, येवले व निंबाळकर यांनी 30 जून 2009 रोजी महाजन यांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले होते. न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. दरम्यान, 16 जानेवारी 2019 रोजी न्यायालयाने लोहार व येवले यांना दोषी ठरवले होते.
३४६ (अ) या कलमाखाली फाशी किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. शिक्षेबद्दल सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश गाडेकर यांनी सुमारे एका तासात शिक्षा सुनावली. या दरम्यान, त्यांनी दोघांच्या गुन्ह्याबद्दल निष्कर्ष नोंदवले. न्यायालयाने सैन्य, सीमा सुरक्षा बल, कोस्ट गार्ड, सीआरपीएफ, नेव्ही व मुंबई पोलिस कायद्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या कर्तव्यात कसूर संदर्भात विभागीय चौकशीची तरतूद आहे; परंतु या खटल्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधाननुसार गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने एका सामान्य व्यक्तीसोबत मिळून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याचे सिद्ध झाले आहे. ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना नसली तरी या कृत्यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.