अटकेनंतर २ तासांत पोलिसांना सांगावी लागतील अटकेची कारणे
नवी दिल्ली : खरा पंचनामा
गुन्हा दाखल झाल्यावर कायद्याबाबत अनभिज्ञ लोक पोलिस अटक करतील म्हणून घाबरून जातात. पण, गुन्ह्यात आरोपीला अटक केल्यावर दोन तासांत संबंधित आरोपीला अटकेची कारणे देणे पोलिसांसाठी बंधनकारक आहे.
त्या आरोपीला अटकेची कारणे समजावून सांगितल्याचे न्यायालयात सांगावे लागते. पोलिसांनी हा आदेश पाळला नाही, तर आरोपीची अटक किंवा रिमांड बेकायदा ठरेल, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
भारतीय न्याय संहितेनुसार अलीकडे सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या अनेक गुन्ह्यांत संशयित आरोपींना शक्यतो अटक केली जात नाही. संबंधितांना नोटीस बजावून पोलिस चौकशीला बोलावतात, त्यानंतरही गरज वाटली तर त्या आरोपीस अटक करून पुढील तपास पोलिस करू शकतात. दुसरीकडे, ६० वर्षांवरील आरोपीस अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यास पूर्वीचा गंभीर आजार असेल तर पोलिस शक्यतो अटक करत नाहीत.
खास करून गुन्ह्यातील मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू हस्तगत करण्यासाठी आरोपीस अटक केली जाते. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील पोलिस एखाद्या आरोपीस अटक करणार असतील तर त्याची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी लागते. तसेच, त्या आरोपीच्या नातेवाइकासही अटकेबद्दल माहिती देणे पोलिसांना बंधनकारक आहे. दाखल गुन्ह्यात सहभाग नसतानाही एखाद्याचे नाव आले असल्यास वकिलांमार्फत ती व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.