Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"बाबाच्या नादी लागू नका, बाईच्या नादी लागा"

"बाबाच्या नादी लागू नका, बाईच्या नादी लागा"

लोणावळा : खरा पंचनामा

भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लोणावळ्यात भाजपा उमेदवारांची भेट घेऊन प्रचार केला. यावेळी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. "मी नेहमी सांगते, बाबांच्या नादी लागू नका, बाईच्या नादी लागा," असे आवाहन त्यांनी महिलांना केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर महिलांमध्ये एकच हशा पिकला.

प्रचाराच्या संदर्भात महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधवदेखील उपस्थित होत्या. यावेळी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. पराभव दिसत असल्याने आणि मानसिक संतुलन बिघडल्याने विरोधक वेगवेगळी वक्तव्ये करून भाजपा नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, "विरोधकांना उत्तर द्यायची गरज नाही, त्यासाठी सुरेखा जाधव पुरेशा आहेत. महिलांनी घराघरांत जाऊन आपण काय काम केले आहे आणि पुढील काळात काय करणार आहोत हे सांगा, यापलीकडे काहीही बोलू नका. आपण निवडून येणारच आहोत, घरोघरी मुंग्यांसारखे फिरा."

पुढे त्या विनोदी शैलीत म्हणाल्या, "नवरा नेता असला तरी घराबाहेरचा नेता असतो. घरात बाईच हुशार असते, तिला संसारात काय चालले आहे हे चांगलेच ठाऊक असते. केंद्राच्या अनेक योजना आहेत, त्यापैकी ३५ टक्के योजना या महिलांसाठी आहेत. खा कुणाचंही मटण, पण दाबा कमळाचं बटण, असं सांगत त्यांनी महिलांना पतीलाही कमळाचं बटण दाबायला सांगण्याचे आवाहन केले.

'नवऱ्याने सांगितलं स्वयंपाक करू नको, तर समजून जायचं -पार्टी आहे! त्याच्या कानात हळूच सांगा : मटण कुणाचंही खा, पण बटण कमळाचं दाबा.' हे २ तारखेपर्यंत सुरूच राहणार, असेही त्या म्हणाल्या."

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.