Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'एक ब्राह्मण त्याच्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करत नाही, तोपर्यंत आरक्षण सुरूच राहील'IAS अधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ

'एक ब्राह्मण त्याच्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करत नाही, तोपर्यंत आरक्षण सुरूच राहील'
IAS अधिकाऱ्याच्या वक्तव्याने खळबळ

भोपाळ : खरा पंचनामा

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मध्य प्रदेशात एका वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. अनुसूचित जाती-जमाती अधिकारी कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ IAS अधिकारी संतोष वर्मा यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आरक्षण आर्थिक निकषांवर आधारित असावे की नाही, या विषयावर बोलताना संतोष वर्मा यांनी हे आक्षेपार्ह विधान केले. त्यांनी म्हटले, 'जोपर्यंत एक ब्राह्मण त्याची मुलगी माझ्या मुलाला दान करत नाही किंवा माझ्या मुलाशी संबंध ठेवत नाही, तोपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे.' आणि त्यातून मोठी राजकीय व सामाजिक खळबळ उडाल्याचे दिसत आहे.

संतोष वर्मा यांच्या वक्तव्याचा अखिल भारतीय ब्राह्मण समाजाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. समाजाचे प्रदेशाध्यक्ष पुष्पेंद्र मिश्रा यांनी या टिप्पणीला 'जातिवादी' ठरवले आहे. 'वर्मा यांनी ब्राह्मण कन्यांचा अपमान केला असून, अखिल भारतीय नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केले आहे', असा आरोपही करण्यात आला आहे.

मिश्रा म्हणाले की, 'ब्राह्मण कन्यांविरुद्ध केलेल्या टिप्पणीबद्दल तातडीने गुन्हा नोंदवावा. IAS अधिकाऱ्याचे हे विधान आक्षेपार्ह असून ब्राह्मण समाजाचा अपमान करणारे आहे. जर लवकरच फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही, तर ब्राह्मण समाज राज्यव्यापी आंदोलन सुरू करेल.'

मिश्रा यांनी पुढे नमूद केले की, 'लाडली लक्ष्मी, लाडली बहना आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ यांसारख्या योजना मुलींचा सन्मानासाठी आणि कल्याणासाठी कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्मा यांचे विधान अत्यंत अयोग्य आहे.'

पुष्पेंद्र मिश्रा यांनी सरकारला कठोर इशारा दिला आहे. ते म्हणाले की, 'जर सरकारने IAS अधिकारी संतोष वर्मा यांच्यावर तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर आम्ही कायदेशीर लढई लढू. तसेच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल,' असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

गोंधळ वाढल्यानंतर, वादग्रस्त वक्तव्य करणारे IAS अधिकारी संतोष वर्मा यांनी सारवासारव करत खुलासा केला आहे. ANI वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी आपले वक्तव्य संदर्भातून वगळले गेले असल्याचे सांगितले. आरक्षण आर्थिक निकषांवर जोडावे की नाही, या चर्चेदरम्यान आपण हे बोललो होतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

वर्मा यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, 'राजकीय वादळ निर्माण करणे हा माझा हेतू नव्हता. माझे म्हणणे केवळ एवढेच होते की, जर मी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलो आणि सामाजिक मागासलेपण दूर झाले असेल, तर माझ्या मुलांना समाजाने सामाजिक समानतेची वागणूक देऊन त्यांच्याशी रोटी-बेटी व्यवहार करायला हवे. माझ्या मनात कोणत्याही समाजाबद्दल कोणतीही द्वेषभावना नाही.'

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.