TET पेपर फुटी प्रकरण : सातारा भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या दोन्ही भावांना अटक
कोल्हापूर : खरा पंचनामा
शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर परीक्षेच्या आधी देतो असे सांगून पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य सुत्रधार महेश भगवान गायकवाड (रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा) आणि त्याचा भाऊ संदीप भगवान गायकवाड याच्यासह अन्य 9 जणांना अटक केली आहे. महेश आणि संदीप हे सातारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भगवान गायकवाड यांचे भाऊ आहेत. प्रमोद गायकवाड हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मसूर गटातून इच्छुक आहेत.
याबाबत कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (23 नोव्हेंबर) झालेल्या टी.ई.टी. परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वी देतो असे सांगून काही जणांनी विद्यार्थ्यांना बोलावले होते. त्यांच्याकडून शैक्षणिक कागदपत्र आणि रोख रक्कम स्विकारुन फसवणूक केली जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने मुरगूड पोलिसांच्या मदतीने कागल तालुक्यातील सोनगे गावच्या हद्दीतील शिवकृपा फर्निचर मॉलमध्ये छापा टाकून संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केलं.
छाप्यादरम्यान, पोलिसांनी 7 जणांना अटक केली होती, तर मुख्य सुत्रधार महेश गायकवाड हा फरार होता. पोलिसांनी तातडीने बेलवाडी येथून त्यास अटक केली. आतापर्यंत या प्रकरणात 18 जणांना अटक केली असून न्यायालयाने सर्वांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची कोठडी आज (25 नोव्हेंबर) संपत असून पोलिसांकडून तपासासाठी आणखी कोठडी वाढवून मागितली जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद, महेश आणि संदीप हे तिघे भाऊ आहेत. हे तिघेही बेलवाडी येथे जय हनुमान करिअर अकॅडमी चालवतात. अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. यातील संदीप हा निवृत्त जवान आहे. महेश गायकवाड याची भागात अंगभर सोने घालून वावरणारा माणूस अशी आहे. त्याचे असे फोटोही पाहायला मिळतात. तर प्रमोद गायकवाड राजकारणात सक्रिय असून ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेच. तसेच मसूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. पण त्यापूर्वीच त्यांच्या दोन्ही भावांचे 'प्रताप' उघडकीस आले आहेत.
मुख्य सुत्रधार महेश भगवान गायकवाड (रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा), रोहीत पांडुरंग सावंत (वय 35, रा. कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), अभिजीत विष्णू पाटील (वय 40, रा. बोरवडे, ता. कागल, जि. कोल्हापूर), संदीप भगवान गायकवाड (वय, 46, रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा), अमोल पांडुरंग जरग (वय 38, रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), स्वप्निल शंकर पोवार (वय 35, रा. कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), रणधीर तुकाराम शेवाळे (वय 46, रा. सैदापूर, ता. कराड, जि. सातारा) तेजस दिपक मुळीक (वय 22, रा. निमसोड, ता. कडेगांव, जि. सांगली), प्रणय नवनाथ सुतार (वय 32, रा. खोजेवाडी, ता. जि. सातारा) संदिप शिवाजी चव्हाण (वय 40, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड, जि. सातारा). श्रीकांत नथुराम चव्हाण (वय 43 रा. विद्यानगर कराड, ता. कराड, सध्या रा. उंब्रज ता. कराड, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.