विरोधकांनी पहिल्या 20 मिनिटांतच लोकसभा दणाणून सोडली...
नवी दिल्ली : खरा पंचनामा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाला सुरूवात होण्याआधी आपली भूमिका स्पष्ट करताना विरोधकांना चांगलेच डिवचले.
बिहार विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला. ज्यांना ड्रामा करायचा आहे, त्यांच्यासाठी अनेक जागा आहेत, पण इथे घोषणाबाजी नव्हे धोरणांवर जोर द्यायला हवे, असे मोदी म्हणाले. त्यानंतर संसदेचे कामकाज सुरू होताच काही मिनिटांत लोकसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर संसदेचे हे पहिलेच अधिवेशन आहे. यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने देशातील १२ राज्यांमध्ये सुरू केलेली मतदारयादी पुनर्पडताळणी प्रक्रिया, मतदारयाद्यांमधील कथित घोळ, बीएलओच्या आत्महत्या आदी मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याचे पडसाद पहिल्याच दिवशी उमटले. पंतप्रधानांनीही अधिवेशनापूर्वी आपली भूमिका स्पष्ट करताना तसे संकेत दिले होते.
बिहार निवडणुकीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, काही पक्षांना पराभवाचा त्रास होत आहे. पण संसद पराभवामुळे निर्माण झालेल्या निराशेचे मैदान बनता कामा नये. विरोधकांना पराभवाच्या निराशेतून बाहेर यायला हवे. ड्रामा करण्यासाठी खूप जागा आहेत. ज्यांना ड्रामा करायचाय, त्यांनी करावा, ज्यांना घोषणा द्यायच्या आहेत, त्यांनी द्यायात. त्यासाठी संपूर्ण देश आहे. पण इथे नारेबाजी नव्हे तर नीतीवर जोर द्यायला हवा.
संसदेत चांगला काम कसे करायचे, याचा विरोधकांना सल्ला द्यायला मी तयार आहे, असे टोलाही मोदींनी लगावला. दरम्यान, संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सुरूवातीला दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या महिला खेळाडूंचे अभिनंदनही लोकसभेत करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नकाल पुकारताच विरोधक आक्रमक झाले.
एसआयआरवर चर्चेची मागणी विरोधकांनी सुरू केली. सर्वपक्षीय विरोधकांनी उभे राहून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतरही अध्यक्षांनी मागणी अमान्य करत प्रश्नकाल सुरू ठेवला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आणि अध्यक्षांसमोरील रिकाम्या जागेत येऊन घोषणा देण्यास सुरूवात केली. अध्यक्षांनी जागेवर जाऊन बसण्याची वारंवार विनंती करूनही विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे बिर्ला यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.