भाजपचे AB फॉर्म पळवले, गाडीत दोन आमदार अन् जिल्हाध्यक्ष... कार्यकर्त्यांकडून गाडीचा पाठलाग
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमध्ये भाजपच्या तिकीट वाटपावरून प्रचंड गोंधळ उडाला आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास शिल्लक असताना नाशिक-मुंबई महामार्गावर थरारक प्रसंग घडला. पक्षाच्या एबी फॉर्मची पळवापळवी झाली आणि त्यासाठी भाजपचे तिन्ही आमदार एकाच गाडीत बसून महामार्गावरून निघाले.
नाशिक शहरात एकूण १२२ जागा आहेत आणि या सर्व जागा भाजप स्वबळावर लढवत आहे. मात्र इच्छुक उमेदवारांची संख्या खूपच जास्त असल्याने तिकीट वाटपात मोठा घोळ निर्माण झाला. पक्षाने निष्ठावंत स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.
या असंतोषाचे केंद्रबिंदू ठरले ते भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार... केदार यांच्या गाडीत आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले हे आमदार बसले होते. या गाडीत एबी फॉर्म असल्याची माहिती मिळताच संतप्त कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी गाडी अडवली. सुनील केदार यांना थेट घेराव घातला गेला. कार्यकर्त्यांनी गाडीचा पाठलाग करत महामार्गावर धाव घेतली.
एबी फॉर्म हा उमेदवारी निश्चित करण्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज असतो. तो अर्ज दाखल करताना असणे आवश्यक असते. मात्र तो फॉर्म घेऊन आमदार आणि शहराध्यक्षांनी पळ काढल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला. AB फॉर्म घेऊन आमदार एका फार्म हाऊसवर गेले. तिथं देखील कार्यकर्ते पोहचले असून फार्म हाऊसचे गेट देखील तोडले आहे.
हा प्रकार केवळ नाशिकपुरता मर्यादित नाही. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपमध्ये असाच असंतोष दिसून येत आहे. अकोला, छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्येही कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पक्ष नेतृत्वाने स्थानिक निष्ठावंतांना बाजूला सारून आयाती उमेदवारांना तिकीट दिल्याने हा रोष वाढला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.