पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातून ३० लाखाचा मुद्देमाल गायब
दोन हवालदारांवर गुन्हा दाखल
धुळे : खरा पंचनामा
जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षातून तब्बल ३० लाख ९१ हजार ४१० रुपयांचा जप्त मुद्देमाल गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन पोलीस हवालदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार नागेश्वर दशरथ सोनवणे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, पोलीस मुख्यालयात नेमणूक असलेले महेंद्र अमरसिंग जाधव आणि निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शरद तुकाराम ठाकरे यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या जप्त मुद्देमालाशी छेडछाड करून तो गायब केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
२०१६ ते २०२४ या कालावधीत विविध गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची अलीकडेच सखोल पडताळणी करण्यात आली होती. नोंदवही आणि प्रत्यक्ष कक्षातील मुद्देमालाची तुलना केली असता मोठी तफावत आढळून आली. अनेक गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल प्रत्यक्षात संबंधित ठिकाणी आढळून आला नाही, तर तो थेट गायब झाल्याचे स्पष्ट झाले. या गायब झालेल्या मुद्देमालात लाठ्या, काठ्या, मोबाईल हँडसेट तसेच अन्य किमती वस्तूंचा समावेश आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे लक्षात येताच ४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सव्वा अकरा वाजता संबंधित दोन्ही पोलीस हवालदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
उघडकीस आलेल्या या घटनेमुळे पोलिस खात्यातील अंतर्गत नियंत्रण व देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लोकसेवक असूनही आपल्या ताब्यातील शासकीय मुद्देमालाचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करून फौजदारी विश्वासघात केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्य मार्गदर्शनाखाली करीत आहेत. आतापर्यंत उपलब्ध पुरावे तपासात घेतले जात असून, आणखी काही कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सबळ पुरावे मिळताच वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.