बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; राज्यात तापमानात वाढ
पुणे : खरा पंचनामा
बंगालच्या उपसागरात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे डिटवाह चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम राज्यात गेल्या काही दिवसांत थंडीची लाट थोडी कमी झाल्याची स्थिती आहे.
सकाळच्या वेळी जाणवणारी थंडी कमी झाली असून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण झाले आहे. कोल्हापूर, सांगली भागात आकाश निरभ्र असून तापमानात चढ-उतार पहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानात वाढ कायम राहील. त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील 'डिटवाह' चक्रीवादळ कमकुवत होत निवळले असून, अरबी समुद्रातील लक्षद्वीपजवळ समुद्रसपाटीपासून सुमारे 1.5 किमी उंचीवर चक्राकार वारे फिरताना दिसत आहेत. उत्तर भारतात मात्र थंडीची लाट तीव्र आहे. पंजाबच्या अदमपूर येथे गुरुवारी (ता. 4) देशातील सपाट भूभागावरील नीचांकी 3 अंश तापमानाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही गारठा कायम असला, तरी किमान तापमान थोडे वाढले आहे. अनेक भागांमध्ये पारा पुन्हा 10 अंशांच्या वर गेला आहे. पहाटे धुक्याची दुलई पसरत असून वातावरणात थंडीची जाणीव आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 8.6 अंश तापमानाची, तर धुळे कृषी महाविद्यालयात 8.7 अंश तापमानाची नोंद झाली. भंडारा येथे पारा 10 अंशांवर आल्याने गारठा जाणवत आहे.
दरम्यान, कोकणात दुपारच्या उन्हाचा चटका कायम असून रत्नागिरी येथे कमाल तापमान 34.5 अंशांपर्यंत पोहोचले. राज्यातील किमान तापमानात आज (ता. 5) वाढ होण्याचा आणि थंडीची जाणीव पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.