अधिवेशन संपताच नागपूरमधील पोलीस निरीक्षकांची खांदेपालट
नागपूर : खरा पंचनामा
उपराजधानीतील ८ ते १४ डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन आटोपले असून बंदोबस्ताचा ताण निवळताच शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांची ठाण्यांतर्गत खांदेपालट करण्यात आली. नागपूर ग्रामीण पोलीस हद्दीतून पदोन्नती मिळालेले चेतनसिंग बबनसींग चव्हाण यांच्याकडे आता बजाजनगर पोलीस ठाण्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली.
येथील अजय केशवराव मानकर यांना वाहतूक शाखेत वर्ग करण्यात आले. पारडीतील महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा नितेश मनघटे यांची गुन्हे शाखा पथक चारमध्ये बदली करण्यात आली. मनघाटे यांच्या जागी सक्करदरा पोलीस ठाण्यातील निरीक्षक सुनिल पंढरीनाथ काकडे यांच्याकडे पारडी ठाण्याचा पदभार देण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथक चारमधील कमलाकर निरसिंह गड्डीमे यांची गुन्हे शाखेच्या (डिटेक्शन) पोलीस उप अधिक्षकांचे वाचक म्हणून बदली करण्यात आली.
दुसरीकडे तब्बल आठ दिवसांच्या कडेकोट बंदोबस्तासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या जिल्हा पोलीस दलात परतले. अनेकांनी संत्रा बर्फीसह नागपूरची आठवण म्हणून कुटुंबासाठी खरेदी करत घराकडे प्रस्थान केले. कडाक्याच्या थंडीतही पोलिसांसाठी यंदा सुधारित निवास व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता यावर्षी पोलिसांसाठी जागोजारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे अन्य जिल्ह्यातून नागपुरात आलेल्या पोलीसांनी पोटापाण्याचा ताण न बाळगता बंदोबस्ताचे कर्तव्य पाळले. अधिवेशाचा बंदोबस्त आटोपल्यानंतर रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळी पोलीस पुढच्या हिवाळी अधिवेशनात भेटू, असे आश्वासन देऊन गावी रवाना झाले. हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेल्या महिला पोलिसांनी निरोप घेताना एकमेकींची भेट घेऊन सोबत 'सेल्फी' काढली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.