Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महसूल विभागाच्या आवारातून जप्त केलेला ट्रॅक्टर लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे चोराचा शोध सुरू

महसूल विभागाच्या आवारातून जप्त केलेला ट्रॅक्टर लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे चोराचा शोध सुरू

केज : खरा पंचनामा

बीड जिल्ह्यामध्ये अवैध गौण खनिज माफियांनी आता थेट प्रशासनालाच आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. केज येथे महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतलेला वाळू/मुरुमाचा ट्रॅक्टर चक्क सरकारी कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

दिनांक २५ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास केज-कळंब रोडवर मुरूमाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. महसूल कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत पोलिसांना पाचारण केले आणि रात्री ११ वाजेच्या सुमारास हा ट्रॅक्टर (ट्रॉलीसह) ताब्यात घेतला. ही जप्त केलेली वाहने सुरक्षिततेसाठी सरकारी कार्यालयाच्या परिसरात उभी करण्यात आली होती.

कारवाई झाल्याचे समजताच संबंधित माफियाने किंवा त्याच्या साथीदाराने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, या अज्ञात व्यक्तीने बनावट चावीचा वापर करून कार्यालयाच्या परिसरात उभा असलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली स्टार्ट केली आणि तिथून पळवून नेली. सकाळी जेव्हा महसूल कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा एकच खळबळ उडाली.

प्रशासनाच्या ताब्यातून वाहन पळवून नेल्यामुळे आता पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, ट्रॅक्टर चोरणारा आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे सरकारी मालमत्तेच्या आणि जप्त केलेल्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.