भाजप उमेदवाराच्या पतीने ईव्हीएम मशीन बंद पडल्याने जमिनीवर आपटले
सोलापूर : खरा पंचनामा
सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषद आणि एका नगरपंचायतीपैकी दहा नगरपरिषदांसाठी आज मतदान झाले. मतदानाच्या वेळी दिवसभर ईव्हीएम मशीन बंद पडण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मोहोळ, कुडुवाडी, सांगोला, अकलूज, बार्शी आणि अक्कलकोट येथील ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे त्या मशीन बदलून मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली. मात्र अकलूजमध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्याने भाजप उमेदवाराच्या पतीने ते मशीन जमिनीवर आपटले.
याबाबतची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे, त्यामुळे अकलूजमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अकलूज नगर परिषदेची पहिलीच निवडणूक असून नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्सुकता दिसून आली. सकाळी थंडी असल्याने गर्दी थोडी कमी होती. मात्र, त्यानंतर मतदार वाढत गेले, त्यामुळे मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. मात्र, सकाळी मतदानाला सुरुवात होताच काही वेळातच प्रभाग क्रमांक पाचमधील अकलाई विद्यालयातील बूथवरील मशिन काही काळासाठी बंद पडली होती. येथील बॅलेट युनिट बदलून दुसरे लावण्यात आले.
दरम्यान, दुपारच्या वेळी प्रभाग ७ 'ब'मधील (स्वीमिंग टँक परिसर) भाजप उमेदवार अंकिता पाटोळे यांचे पती अंबादास पाटोळे (उमेदवाराचे प्रतिनिधी) यांनी मशिनचे बटण अडकते; म्हणून मशिनच जमिनीवर आपटल्याची तक्रार क्रांतिसिंह माने-पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिली आहे. त्यावर पोलिसांनी अंबादास पाटोळे यांना ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.