'नगारा' चिन्ह दाबताच 'कमळ' समोरील दिवा लागला; रागाच्या भरात मतदाराने ईव्हीएम फोडले
चंद्रपूर : खरा पंचनामा
गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मंगळवारी (दि.२) प्रभाग क्रमांक ९ मधील आदर्श हिंदी विद्यालय (केंद्र क्रमांक २) येथे ईव्हीएम मशीनवरून मोठा वाद निर्माण झाला.
सायंकाळी मतदानाला आलेल्या राम मल्लेश दुर्गे (वय ४०) या मतदाराने 'नगारा' चिन्हाचे बटन दाबताच अचानक बाजूला असलेल्या भाजपच्या 'कमळ' चिन्हाचा दिवा लागल्याचा गंभीर आरोप करत संतापाच्या भरात ईव्हीएम मशीन फोडून टाकले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
मतदाराचा आरोप आणि मशीन फोडल्याची घटना समजताच केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. संतप्त नागरिकांनी "भाजप मुर्दाबाद"च्या घोषणा देत आंदोलनाचा पवित्रा घेतला. परिणामी काही वेळ मतदान प्रक्रियेलाच ब्रेक बसला आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, गडचांदूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु या केंद्रावर बराच वेळ तणावपूर्ण स्थिती होती.
पोलिसांनी तत्काळ पंचनामा प्रक्रिया सुरू केली असून ईव्हीएम मशीन जप्त करण्यात आले आहे. मतदान पुन्हा सुरळीत करण्यात आले असून या घटनेबाबत पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणामुळे प्रभाग ९ मधील राजकीय वातावरण तापले असून मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. केंद्राबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी यासाठी प्रशासन सतर्क होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.