मतदान यंत्रे ठेवलेल्या कक्षाला कार्यकर्त्यांचा खडा पहारा
राष्ट्रवादीने स्वखर्चातून लावले 'सीसीटीव्ही कॅमेरे'
परभणी : खरा पंचनामा
जिल्ह्यात चुरशीने लढल्या गेलेल्या पालिका निवडणुकीत आपापल्या बाजूने मतदारांना वळवण्यासाठी उमेदवारांनी प्रयत्नांची शिकस्त केली खरी पण आता जिंतूर, गंगाखेड या ठिकाणी मतदान यंत्रे ठेवलेल्या कक्षांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खडा पहारा देणे सुरू केले आहे.
गंगाखेड येथे राष्ट्रवादीने ' ईव्हीएम स्ट्रॉगरूम' समोर 'सीसीटीव्ही कॅमेरे' लावले असून संबंधित पक्षाचे कार्यकर्ते तीन पाळ्यांमध्ये २४ तास गस्त घालण्यासाठी तैनात आहेत. जिंतूर येथेही याच पद्धतीने राष्ट्रवादीने खबरदारी घेतली आहे.
जिल्ह्यात पालिका निवडणुका अटीतटीच्या वातावरणात पार पडल्या. विशेषतः जिंतूर, गंगाखेड, पाथरी या तीन ठिकाणी जोरदार चुरस पाहायला मिळाली. आर्थिक उलाढालीही या तीनच ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्या. जिंतूर येथे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि माजी आमदार विजय भांबळे यांच्या सत्तासंघर्षात निवडणुकीची धार तीव्र होती. तर गंगाखेडला आमदार रत्नाकर गुट्टे विरुद्ध माजी आमदार मधुसूदन केंद्रे हा टोकदार संघर्ष निवडणुकीत पाहायला मिळाला. आता निकाल २१ डिसेंबरला असला आणि मतदानयंत्रे कडेकोट सुरक्षा यंत्रणेत असली तरी जिंतूर आणि गंगाखेड या ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दिवसरात्र 'स्ट्राँग रूम' बाहेर गस्त लावली आहे.
गंगाखेड येथे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी स्वखर्चातून कॅमेरे बसवले आहेत. मतदान यंत्रे ठेवलेल्या कक्षा बाहेर पक्षाचे निवडक कार्यकर्ते नजर ठेवून आहेत. २४ तासांपैकी दर आठ तासाला कार्यकर्ते बदलत आहेत. तीन पाळ्यांमध्ये ही निगराणी केली जात आहे. पोलीस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा यंत्रणा ठेवली असली तरी कुठलाही दगा फटका होऊ नये म्हणून कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून आहेत. जिंतूर येथेही माजी आमदार विजय भांबळे यांनी मतदान यंत्राच्या स्ट्राँगरूम समोर आपल्या कार्यकर्त्यांचा खडा पहारा ठेवला आहे. मतमोजणी अवघ्या दहा-बारा दिवसांवर आली असली तरी कार्यकर्ते सतर्क आहेत.
आम्ही सत्ताधारी पक्षाचे असलो तरी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेवर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही. अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधीचे सालगडी असल्याप्रमाणे वागतात. परिणामी आम्ही स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.