रविवार आरोग्य विशेष
सकाळचा व्यायाम नक्कीच हवा पण...
सांगली : खरा पंचनामा
थंडीत किंवा कुठल्याही सिझनमध्ये फिटणेस राखण्यासाठी, सकाळी फिरायला जाणे हा नक्कीच चांगला व्यायाम आहे हे फायदेशीर व सर्वश्रुत आहे. दररोज ५ ते ६ किलोमीटर अंतर, अर्ध्या तासात पार केल्यास योग्य ते फायदे शरिरास मिळतात हे मी सांगण्याची गरज नाही.
फक्त या फिरण्यामुळे प्रश्न येतात ते अनेक? बोचऱ्या थंडीत सकाळी ५ वाजता फिरायला जाण्यात कसला तो शहाणपणा? आणि ते सुध्दा रस्त्यावर ! आजारांना व अपघाताला निमंत्रण देण्यातलाच तो एक प्रकार आहे.
मित्र हो, बोचऱ्या थंडीत बाहेर गेल्याने पडसे, सर्दी, सायनसचे विकार (५०-६० वर्षानंतर) बळावण्याची शक्यता असते हे सांगण्यास डॉक्टराची गरज लागत नाही (Common sense). पहाटे स्पष्ट दिसत नसते, त्यामुळे Accident होण्याची शक्यता अधिक, तसेच वाहतुकीस होणारा अडथळा ही गोष्ट निराळीच. पहाटेस परगावाहून येणारी व जाणारी वाहने, रस्ते मोकळी असल्याने वेगात असतात व त्यामुळे Accident चा धोका अधिकच संभवतो.
याउपर कांही लोक डांबरी रस्त्यावर झोपून वेगवेगल्या प्रकारची आसने करीत असतात. मला आश्चर्य वाटते, त्यांना वाहनांची भिती कशी वाटत नाही? याउलट मी बाहेरगावी जात असताना मलाच या लोकांची भिती वाटते की जर हे आपल्या वाहनाखाली आले तर?
महिलांच्या बाबतीत दागिने हिसकावून घेण्याचे (Chain Snaching) प्रकार सुध्दा अश्याच कमी प्रकाशाच्या वेळी (पहाटे सायंकाळी) घडतात व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्तातून चालताना वाहनातून बाहेर येणारा धूर (कार्बन मोनाक्साईड) व धूळ आपल्या फुफ्प्यूसात जावून होणारे तोटे अधिक असतात. सायंकाळी मेनरोडवर गर्दीत, धक्काबुक्की करत फिरायला जाणारे लोक, किती धूळ व धूर घेत असतील याचा विचारच न केलेला बरा. याउपर वाहतुकीस व रहदारीस होणारा अडथळा तो वेगळाच.
बरं असं रस्त्यावर चालत असताना व्यायामासाठी ज्या प्रकारे चालावयास हवं तसं आपण चालूच शकत नाही. याउपर सर्व लक्ष 'आपल्याला कोण बघतयं का', 'याला ओळख दाखव', 'त्याला हात कर' इत्यादी अनावश्यक गोष्टीत जाते. कांही महाभाग सकाळी कानात Earpieces वर गाणी ऐकत व एका हातात आपल्या प्रिय श्वानाची (कुत्रे) साखळी घेवून फिरत असतात. आणि मग ते श्वान चांगले ४/५ फूट इकडे तिकडे पळत असते. त्याचा त्रास सकाळी लवकर क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच वाहनांना होतो हे या लोकांच्या लक्षात कसे येत नाही हाच प्रश्न येतो. या त्यांच्या प्रिय श्वानाने दिलेल्या हिसक्याने पडून मनगटाचे हाड मोडल्याची २-३ उदाहरणे मीच पाहिली आहेत.
मग विचाराल की या माणसांनी जायचे तरी कोठे? मित्र हो, बागेतील ट्रॅकवर (अमराई, ब्रापट मळा, साखर कारखाना ग्राऊंडवरील ट्रॅकवर, कॉलनी रोड, नदीवरील ट्रॅकवर, घरातील गच्चीवर, वेगवेगळ्या कॉलेज वरील तसेच शाळांमधील ग्राऊंड अशी अनेक ठिकाणे आहेत, जी आपल्याला वरील सर्व धोक्यापासून वाचवून, शुध्द हवेत फिरायचा आनंद देतील.
लाँग रन मध्ये भाग घेणारे खेळाडू रस्त्याच्या बरोबर मधून पळत असतात. याला काय म्हणावे बरे? रिटायर्ड व सिनिअर सिटीझन्स सुध्दा असेच पहाटे फिरायला जातात. ब्लडप्रेशर, मधुमेह, सांधेवात, बहिरेपणा, डोळ्यांचे विकार यांना असतातच. यांनी तर अजिबात रस्त्यावर येवू नये. घरी बायको, मुले, नातवंडे काळजी करत असतात हे त्यांना समजत कसे नाही. सुर्योदयानंतर कोवळ्या ऊनात बागेत किंवा ग्राऊंडच्या ट्रॅकवर, गच्चीत फिरणे केव्हाही चांगले. ऊन, स्वच्छ हवा, धोकारहीत व अडथळा न होणारी जागा, यापेक्षा आणखी चांगले काय असू शकते.
बऱ्याच दिवसांची या विषयीची माझ्या मनातली घालमेल कागदावर उतरवण्याची माझी मनिषा मी पूर्ण केली व आता समाजापर्यंत पोहचवण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपण हे वाचून अंमलात आणाल तेंव्हा माझे पूर्ण समाधान होईल. धन्यवाद !!!
डॉ. मोहन पाटील
M.B.B.S., D.A., M.B.A.
भूलशास्त्रतज्ञ, सांगली
मोबा. 9823042799, 7385713572
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.