वाढदिवसाच्या दिवशीच 'सलमान'ला कोर्टाचा झटका.! खोट्या सहीमुळे सापडला अडचणीत
कोटा : खरा पंचनामा
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आज आपला ६० वा वाढदिवस पनवेलच्या फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. मात्र, याच आनंदाच्या क्षणी सलमान एका नव्या कायदेशीर कचाट्यात सापडला आहे.
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादात आता 'बनावट सही'चा गंभीर आरोप झाल्याने राजस्थानमधील कोटा येथील ग्राहक न्यायालयाने सलमानला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
हे संपूर्ण प्रकरण 'राजश्री पान मसाला' या ब्रँडच्या जाहिरातीशी संबंधित आहे. या जाहिरातीत 'वेलची आणि केशर' असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा दावा खोटा असून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याची तक्रार वकील इंद्र मोहन सिंह यांनी कोटा न्यायालयात केली होती. सलमान खान या ब्रँडचा चेहरा असल्याने त्याचीही यात जबाबदारी असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
भाजप नेते आणि वकील इंद्र मोहन सिंग हनी यांनी १५ ऑक्टोबर रोजी सलमान खान याच्याविरोधात खटला दाखल केला होता. तक्रारीत मोहन सिंग यांनी आरोप केला होता की राजश्री पान मसाला आणि सलमान खान यांनी त्यांच्या उत्पादनाला केशरयुक्त वेलची पान मसाला असे संबोधून ग्राहकांची दिशाभूल केली.
त्यांचं असं म्हणणं आहे की, केसर ४ लाख रुपये किलोने मिळतो... तर पान केशरयुक्त वेलची पान मसाला ५ रुपयांचा कसा असू शकतो... असे आरोप सलमान खान याच्यावर करण्यात आले आहेत.
या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती सलमानच्या स्वाक्षरीवरून. ९ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत तक्रारदाराने दावा केला की, न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरील सलमानची सही ही बनावट आहे. जोधपूर कारागृह आणि इतर जुन्या न्यायालयीन प्रकरणांतील सलमानच्या मूळ सह्या आणि कोटा न्यायालयात सादर केलेल्या सह्यांमध्ये मोठा फरक आहे. या आरोपांमुळे न्यायालयाने आता सलमानच्या स्वाक्षरीची फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. न्यायालयाने केवळ सलमान खानलाच नाही, तर या कागदपत्रांचे नोटरीकरण करणारे वकील आर. सी. चौबे यांनाही उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. फॉरेन्सिक अहवालात जर ही सही बनावट असल्याचे सिद्ध झाले, तर सलमान खानच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.