तडीपार गुंडाचा महिलेवर बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन
पिंपरी : खरा पंचनामा
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीसह पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला गुंड पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात आला. त्याने एका महिलेवर बलात्कार केला. तडीपार केलेल्या आरोपीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे या प्रकरणात निलंबन झाले आहे.
फारुख सत्तार शेख (२५, बालाजीनगर, भोसरी एमआयडीसी) असे आरोपीचे नाव आहे. फारुख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचे मूळ वास्तव्य एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजीनगर झोपडपट्टी येथे आहे. तर तो सध्या आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी फाटा येथे राहत होता.
त्याचा गुन्हेगारी इतिहास पाहता त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ८ एप्रिल २०२४ मध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीसह पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून तडीपार आरोपी दत्तक योजना राबवली जाते. ज्या पोलीस ठाण्यातील आरोपी तडीपार केले जातात, ते आरोपी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलकडे विभागून दिले जातात. तडीपार केलेल्या आरोपींचे लोकेशन घेणे, ते सध्या काय करतात याबाबत माहिती अद्ययावत ठेवणे. त्यांनी कोणताही गुन्हा करू नये यासाठी वेळोवेळी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित पोलीस कॉन्स्टेबलची असते. आरोपी फारुख सत्तार शेख याला एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल भागवत शेप यांना दत्तक देण्यात आले होते.
पोलीस कॉन्स्टेबल भागवत शेप यांनी आरोपी फारुख सत्तार शेख याच्यावर वेळोवेळी लक्ष ठेवणे, त्याचे वेळोवेळी लोकेशन घेणे, त्याने कोणताही गुन्हा करू नये तसेच तडीपार केलेल्या हद्दीत प्रवेश करू नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी शेप यांच्यावर होती. मात्र मागील दोन महिन्यांपासून आरोपी फारुख सत्तार शेख हा पोलिसांच्या नाकावर टिच्चून आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंबळी फाटा येथील घरी वास्तव्य करीत होता. याची कोणतीही खबर पोलिसांना लागली नाही. त्याने १८ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एका ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. महिलेने सहा दिवसानंतर याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांना या आरोपीबाबत माहिती मिळाली. वेळीच निगराणी ठेऊन योग्य ती कारवाई केली असती तर महिलेवर अतिप्रसंगाची वेळ आली नसती.
या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल भागवत शेप यांचे निलंबन झाले आहे. शेप यांनी त्यांना दत्तक दिलेला आरोपी फारुख सत्तार शेख याच्यावर निगराणी ठेवणे आवश्यक होते. त्यांनी निगराणी ठेवली नसल्याने तो मागील दोन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राजरोसपणे वावरत होता. शेप यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.