Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मध्यरात्री थरार! निवडणूक आयोगाचा छापा अन् भाजप उमेदवाराचा मुलगा रंगेहाथ अटकेत

मध्यरात्री थरार! निवडणूक आयोगाचा छापा अन् भाजप उमेदवाराचा मुलगा रंगेहाथ अटकेत

पुणे : खरा पंचनामा

नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या आचारसंहिता लागू आहे. या काळात आचारसंहितेचा भंग करणाऱ्या उमेदवारांवर निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. अशाच एक धक्कादायक पुण्यात घडला आहे. पुण्यात भाजप उमेदवाराच्या मुलासह दोन जणांना प्रचारासाठी मद्य वाहतूक करताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील ऊरळी देवाची नगरपरिषदेची निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार असून 21 डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान हडपसर येथील फुरसुंगी भागात मध्यरात्री निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली. तपासणी दरम्यान भाजप उमेदवाराच्या मुलासह दोघे जण मद्याच्या बाटल्या वाहनातून नेत असल्याचे आढळून आले.

या कारवाईत मद्याच्या बाटल्या आणि संबंधित मोटार असा सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावे वेदांत राहुल कामठे वय 19 आणि आकाश तुकाराम मुंडे वय 24 अशी असून दोघेही फुरसुंगी, हडपसर सासवड रस्ता परिसरातील रहिवासी आहेत.

या प्रकरणी सुहास गवळी वय 36 यांनी फिर्याद दिली असून ते निवडणूक आयोगाच्या पथकात कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेदांत कामठे हा भाजप उमेदवार राहुल कामठे यांचा मुलगा आहे. निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आयोगाच्या पथकावर असते.

घटनेच्या दिवशी पुणे सोलापूर महामार्गावरून फुरसुंगीकडे जाणारी एक कार तपासणी नाक्यावर थांबवण्यात आली. तपासणीदरम्यान कारमधून मद्याच्या बाटल्या सापडल्या. याबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने बेकायदा मद्य वाहतूक उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करून मद्य आणि वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.