Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठी कळत नसतानाही मराठीतून तपास!न्यायालयाचे सीबीआयवर ताशेरे

मराठी कळत नसतानाही मराठीतून तपास!
न्यायालयाचे सीबीआयवर ताशेरे

नागपूर : खरा पंचनामा

लाचखोरीसारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना तपास अधिकाऱ्यालाच सादर केलेले पुरावे आणि आरोपपत्र समजत नसतील, तर तो तपास किती विश्वासार्ह ठरू शकतो? हाच प्रश्न उपस्थित करत अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने सीबीआयच्या तपासावर ताशेरे ओढले.

मातृभाषा तेलुगू असलेल्या अधिकाऱ्याने मराठीत आरोपपत्र व पुरावे सादर केले; मात्र न्यायालयातील उलट तपासणीत त्याला त्याचे स्पष्टीकरण देता न आल्याने संपूर्ण तपास प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. परिणामी, दोन रेल्वे अधिकाऱ्यांवरील लाचखोरीचे आरोप न्यायालयाने फेटाळून लावत त्यांची निर्दोष मुक्तता केली.

अमरावती जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ऋतेश जी. वाघमारे यांनी हा निकाल दिला आहे. ही कारवाई नागपुरातील सीबीआयच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने केली होती. चांदवड गोविंद बुडे (वय ५५) तसेच गुलाब अब्दुल शहा (वय ५५) अशी निर्दोष ठरलेल्या आरोपींची नावे आहेत.

दोघेही रा. अंजनगाव सुर्जी अशी आरोपींची नावे आहेत. ते दोघेही मध्य रेल्वेमध्ये वरिष्ठ विभाग अभियंते म्हणून कार्यरत होते. दोघेही अमरावती येथील बडनेरा स्थानकावर कार्यरत होते. या दोघांनी एका शेतकऱ्याकडून ३,५०० रुपयांची लाच मागितल्याचा व स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप होता. रेल्वे पुलाखालून पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याच्या परवानगीसाठी ही लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने १७ डिसेंबर २०१४ रोजी सापळा रचून त्यांना रंगेहाथ अटक केली होती.

सीबीआयने तपासाअंती आरोपपत्र दाखल केले. अॅड. मकसूद आझरे यांनी या प्रकरणी आरोपींची बाजू मांडली. न्यायालयाने १३ साक्षीदार तपासले. मात्र, या तपासातील सगळ्यात मोठी त्रुटी हा खुद्द तपास अधिकारी अधिकाऱ्यांची मातृभाषा तेलुगू होती. त्याला मराठी कळत नसल्याचे समोर आले. त्याने सादर केलेले आरोपपत्र व त्यातील पुरावे मराठीत होते. उलट तपासणी दरम्यान त्याची भांबेरी उडाली. त्याला तपास व पुराव्यांचे योग्य स्पष्टीकरण देता आले नाही. तसेच ज्या अधिकाऱ्याने सापळा रचला, त्याचेही बयान तपास अधिकाऱ्याने नोंदविले नसल्याचे समोर आले.

त्यामुळे त्याने काय तपास केला आणि काय पुरावे सादर केले हे त्यालाच कळलेले नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. याखेरीज या प्रकरणातील साक्षीदारांचे बयान आणि तपासातील कागदपत्रे यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. लाचेची मागणी व ती स्वीकारल्याचे पुरावे सादर करण्यात सीबीआयला अपयश आले. तक्रारदार व बुडे यांच्यात थेट भेट झाल्याचा ठोस पुरावा आढळला नाही. त्यामुळे अखेर न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.