पैसा डबल करण्याच्या आमिषाला पोलिसही बळी;
सखोल चौकशीचे एसपींचे आदेश
रत्नागिरी : खरा पंचनामा
चिपळूण येथील टीडब्लूजे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये झालेल्या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचे प्रकरण आता पोलिस प्रशासनाच्या रडारवर आले आहे. या कंपनीत अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याची माहिती समोर आल्यानंतर रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
चिपळूणमधील या खासगी कंपनीने अल्पावधीत जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवून अनेक नागरिकांना आकर्षित केले होते; मात्र या गुंतवणुकीच्या ओघात जिल्हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनीही मोठ्या रकमा गुंतवल्याची चर्चा होती. सरकारी कर्मचारी असताना अशाप्रकारच्या खासगी वित्तीय व्यवहारांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी विभागाची परवानगी घेतली होती का आणि या गुंतवणुकीसाठी वापरलेल्या पैशांचा स्रोत काय आहे, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
पोलिस अधीक्षक बगाटे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत स्पष्ट केले आहे की, पोलिसदलाची शिस्त आणि प्रतिमा जपण्यासाठी अशाप्रकारच्या संशयास्पद गुंतवणुकीची चौकशी होणे गरजेचे आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने नियमांचे उल्लंघन करून किंवा पदाचा गैरवापर करून गुंतवणूक केली असेल तर त्यावर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. या चौकशीसाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात येणार असून, कंपनीचे आर्थिक व्यवहार आणि त्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तपासली जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.