महापालिका निवडणुकीसाठी सांगली पोलीस सज्ज
कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलणार : पोलीस अधीक्षक संदीप घुगे
सांगली : खरा पंचनामा
महापालिका निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. मिरज शहरातील दोन टोळ्यातील १६ गुन्हेगारांवर मोकाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच सांगलीतील एका टोळीवर मोकाचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलल्याची माहिती पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
अधीक्षक घुगे म्हणाले, १ हजार ५०० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३६५ शस्त्र परवाने रद्द करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस दल दक्ष आहे. मागील दहा वर्षात दोनपेक्षा अधिक गुन्हे आणि निवडणूक काळात गुन्हे दाखल असलेल्या दीड हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. संघटित गुन्हेगारी संदर्भात जिल्ह्यातील सोळा आरोपींवर मोकाचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक सुनिल फुलारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील काही भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार आहे. तसेच नाकाबंदीचे नियोजन केले आहे.
स्ट्रॉंग रुमच्या बंदोबस्तासाठी एसआरपीची तुकडी तैनात केली जाणार आहे. परजिल्ह्यातून ७०० होमगार्ड सांगलीत येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील १४ पोलीस निरिक्षक, ७० सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक तसेच १ हजार ११० पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त तैनात असणाार आहे. पोलीस गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचे काम करीत असून नागरिकांनाही कोणते गैरप्रकार निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.
आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात मागील काही महिन्यात वाढ झाली असून नजीकच्या काही दिवसात सुमारे ३६५ शस्त्र परवाने रद्द करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मृत व्यक्ती आणि शारिरीक क्षमता दुर्बल झालेल्यांचा समावेश असल्याचे घुगे म्हणाले. कोणीही विनापरवाना मिरवणूक काढल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मद्य पिवून वाहन चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल. तसेच यासंदर्भात कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देण्यासाठी राजकीय नेत्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.
शहरात काही पोस्टर लावण्यात आली आहेत. त्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करण्यात आल्याचे दिसत आहे. यामध्ये काही राजकीय उल्लेख असल्याचे निदर्शनास आले आहे. ही पोस्टर कोण लावली याबाबत पोलीस माहिती घेत असून त्यांची नावे निष्पन्न झाल्यावर अफवा पसरविल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही अधीक्षक घुगे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.