एमपीएससीच्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात; गृहमंत्रालयाकडे मागणी
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पीएसआय पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या भरतीला विलंब झाल्याने काही उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली जात आहे. त्यासंदर्भात, संबंधित विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली.
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा 2025' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या 5-6 महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे समस्या मांडल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमख शरद पवार यांनी दिली. तसेच, महाराष्ट्र शासनाने या मागण्यांचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा 28 वर्षांवरून 35 वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी केवळ 1 वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी तात्काळ 1 वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी या विद्यार्थी, उमेदवारांकडून केली जात आहे.
विशेष म्हणजे पीएसआय पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध होण्यास 7 महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक 1 नोव्हेंबर 2025 निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक 1 जानेवारी 2025 ग्राह्य धरावा, अशी मागणी संबंधित उमेदवारांनी केली असून वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा, असे शरद पवार यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) 2025 च्या जाहिरातीमध्ये एकूण 674 पदे जाहीर झाली असून त्यात पोलीस उपनिरीक्षकांसाठी (पीएसआय) 392 पदांचा समावेश आहे. या परीक्षेदरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एकवेळची विशेष संधी देण्याची मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, उमेदवारांच्या मागणीनुसार वयाच्या सवलतीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.