शासनाची बिले थकल्याने कंत्राटदार उधारी चुकवण्यासाठी बनला चोर
यवतमाळ : खरा पंचनामा
गावाचा कारभारी, लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारा 'उपसरपंच' आणि शासकीय कामे करणारा कंत्राटदार... पण आज तोच व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे. ही वेळ त्याच्यावर शासनाकडून थकलेल्या देयकांमुळे आलेल्या हतबलतेतून ओढवली आहे.
स्थानिक आर्णी मार्गावरील नऊ लाखांच्या चोरीचा तपास करताना अवधूतवाडी पोलिसांनी शहरालगतच्या तळेगाव-भारीचे उपसरपंच दिनेश मंडाले यांना ताब्यात घेतले, तेव्हा संपूर्ण जिल्हा हादरला. साबीर हुसेन भारमल यांच्याकडे दिनेश मंडाले हे दूध पोहोचवण्याचे काम करायचे. विश्वासू चेहरा असल्याने त्यांच्यावर कोणालाही संशय नव्हता. गुरुवारी सकाळी ९:३० वाजता साबीर यांनी बँकेत भरण्यासाठी घरून नऊ लाखांची रोख आणली.
पैशांची ही बॅग त्यांनी काऊंटरवर ठेवली. यावेळी गिऱ्हाईक बनून आलेल्या व्यक्तीने काही साहित्य मागितले. ते साहित्य देण्यासाठी साबीर यांची पाठ फिरताच त्या व्यक्तीने ती बॅग लंपास केली. सीसीटीव्हीमध्ये चेहरा झाकलेला असल्याने सुरुवातीला पोलीस चक्रावले, पण तपासाची चक्रे तळेगाव-भारीकडे वळली आणि सत्य समोर आले.
महाराष्ट्रात सध्या कंत्राटदारांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायती आणि नगर परिषदांमध्ये रस्ते, नाल्यांची कामे पूर्ण होऊनही कंत्राटदारांना वर्षानुवर्षे पैसे मिळत नाहीत. शासनाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने कंत्राटदार खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतात. वसुलीचा तगादा वाढतो, मात्र ते चुकवायला पैसे नसल्याने कंत्राटदारावर चोरी करण्याची वेळ आली, हे या गुन्ह्याच्या तपासातून पुढे आले. उपसरपंच असूनही खिशात पैसे नसल्याने आणि उधारी थकल्याने समाजात तोंड दाखवणे कठीण झाले होते, याच मानसिक दडपणातून हा चोरीचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. कंत्राटदाराने नियमाप्रमाणे काम केले, पण व्यवस्थेने त्याला गुन्हेगार बनवले, अशीच काहीशी भावना सध्या यवतमाळच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उमटत आहे.
ही घटना प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. कंत्राटदारांची देयके वेळेवर निघाली नाहीत, तर उद्या पांढरपेशा वर्गातील अनेक लोक निराशेपोटी अशाच गुन्हेगारी मार्गाला लागण्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या क्षेत्रातील 'सिस्टम'च्या अपयशाचे विदारक दर्शन घडवते, असे एका शासकीय कंत्राटदाराने सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.