Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"सर्व इलेक्ट्रिक वाहनांना आठ दिवसांत टोल माफी द्या, वसूल केलेली रक्कम सुद्धा परत द्या"विधानसभा अध्यक्षांचा आदेश

"सर्व इलेक्ट्रिक वाहनांना आठ दिवसांत टोल माफी द्या, वसूल केलेली रक्कम सुद्धा परत द्या"
विधानसभा अध्यक्षांचा आदेश

नागपूर : खरा पंचनामा

हिवाळी अधिवेशनात ई-वाहनाबाबत (EV) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात आदेश दिला आहे. "सर्व इलेक्ट्रिक वाहनांना आठ दिवसांत टोल माफी द्या, टोल माफी जाहीर झाल्यानंतर वाहनचालकांकडून जी रक्कम वसूल केली आहे. ती रक्कम सुद्धा परत द्या, असा आदेश नार्वेकरांनी दिला आहे. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता.

आमदार अनिल पाटील यांनी याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. ई वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण या संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे अनिल पाटील यांनी विधानसभेत सांगितले. त्यावर नार्वेकर यांनी हे आदेश दिले. "ईव्ही टोलमाफीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीपासून आजपर्यंतच्या काळात टोल घेतला गेला असल्यास पुरावा सादर केल्यावर नागरिकांना टोल परतावा द्यावा, असे आदेश नार्वेकरांनी दिले आहेत.

अनिल पाटलांच्या प्रश्नाला उत्तर देताना दादा भुसे म्हणाले, "महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू या मार्गावर ई-वाहनांना टोलमाफीचे धोरण 23 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आले असून 22 ऑगस्ट 2025 पासून अंमलबजावणी सुरू आहे. ईव्ही फास्टटॅग रजिस्ट्रेशन, एनआयसी डेटाबेसमधील नोंदणी आणि बँक इंटिग्रेशनची प्रक्रिया सुरू आहे,"

टोल माफी लागू करण्यास तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याचे दादा भुसे यांनी कबूल केले. तीन महिन्यांचा उशीर झाल्याचे ते म्हणाले. टोल प्रणालीत ईव्ही वाहनांना कर सवलत मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व बदल करण्यात येतील असे आश्वासन भुसे यांनी यावेळी सभागृहात दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.