जीपवर उभं राहून भाषण; आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्टाईलने पेटवली मशाल!
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शुक्रवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील सभेची आठवण करून देणारा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. मुंबईत मराठी माणसांच्या हक्कासाठी हिंदुत्वाचा जागर करत बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर एका कारवर उभे राहून भाषण केलेले बाळासाहेब ठाकरे आजही सगळ्यांना आठवतात.
राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने फुंकले आहे. मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र येत युतीची घोषणा केली. तर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांनी आजोबांच्या स्टाईलमध्ये जीप वर उभे राहून भाषण करत शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्था गणपतीला साकडे घातले.
संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीची मशाल पेटवत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीला ललकारले. शिवसेना पक्ष फोडणाऱ्या भाजप आणि त्यांना साथ देणाऱ्या एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत गेलेल्या 40 आमदारांचा आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतला. गद्दारांकडे पैशांच्या बॅगा, दारूची दुकाने कुठून आली? असा थेट सवाल करत पालकमंत्री संजय शिरसाट, जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांना डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या पाण्याच्या मुद्द्यालाही आदित्य ठाकरे यांनी हात घातला. मात्र याचे खापर भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडत संभाजीनगरकरांना पाणी कधी देणार? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांच्या शिवसेना पक्षातील प्रवेशावरून टीकेचे लक्ष केले जात असल्याने आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात यावरही भाजपला (BJP) फैलावर घेतले. आधी तुमच्या पक्षात गुन्हेगार, भ्रष्टाचारी लोकांना प्रवेश का दिला? याचे उत्तर द्या आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवा, आधी भाजपमधल्या घोटाळेबाज मामूबद्दल बोला असा ठाकरे शैलीत टोला आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.