अधिवेशनात भाजपा आमदाराला बसला विजेचा धक्का
ठाकरेंच्या आमदाराकडून एसआयटी चौकशीची मागणी
नागपूर : खरा पंचनामा
विधीमंडळाचे अधिवेशन म्हटले की, सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येतात. विरोधक विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतात. त्यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षावर आरोप करताना दिसतात.
सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. मात्र आज (12 डिसेंबर) विधान परिषदेत एक अनपेक्षित घटना घडली आणि एकच हशा पिकला.
भाजपा आमदार प्रसाद लाड हे आज विधान परिषदेत समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून बोलायला उभे राहिले. यावेळी माईकला हात लावल्यानंतर त्यांना वीजेचा धक्का जाणवला. त्यांनी या संबंधीची तक्रार सभापती राम शिंदे यांच्याकडे केली. सभागृहात माईकला हात लावताच वीजेचा धक्का लागण्याची ही दुसरी वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल, असे वक्तव्यही प्रसाद लाड यांनी केले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर प्रसाद लाड यांच्या बाजूलाच बसलेल्या प्रविण दरेकर यांनीही हजरजबाबी टिप्पणी करत म्हटले की, तुम्हाला जर काही झालं, तर तुमचा पुतळा उभारू. तसेच प्रसाद लाड यांची आताच एक चौकशी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले. प्रविण दरेकर यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहातील वातावरण काही वेळ हलकफुलकं बनलं होतं.
प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर यांच्या वक्तव्याने सभागृहातील वातावरण मिश्किल बनलं असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विजेचा धक्का लागण्याच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली. तसेच घटनास्थळी प्रत्यक्ष तपास करून नेमकं काय झालं आहे, याचा उलगडा होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. अनिल परब यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहातील हलकफुलक वातावरण काही काळ गंभीर दिशेला वळले. मात्र इतर सदस्यांच्या विनोदी प्रतिक्रियांमुळे पुन्हा एकदा सभागृहातील चर्चा मिश्कील टिप्पणींकडे झुकली.
राम शिंदे यांच्या तक्रारीनंतर सभागृहात जे हलकफुलकं वातवरण बनलं होतं, त्यात सभापती राम शिंदे यांनी देखील हस्तक्षेप केला. प्रसाद लाड यांच्या दिशेने पाहत राम शिंदे म्हणाले की, तुम्ही सभागृहाचे लाड आहात, त्यामुळे तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुमची काळजी घेतली जाईल. प्रसाद लाड यांनी सांगितलेल्या तक्रारीमुळे सभागृहाची काही मिनिटे वाया गेली असली, तरी त्यांच्या तक्रारीची नोंद घेऊन उपकरणांची तपासणी करण्याचे आश्वासन मी देतो, असे राम शिंदे यांनी म्हटले. यानंतर सभागृहातील परिस्थिती स्थिर झाली आणि त्यानंतर प्रसाद लाड यांनी ठाणे/भिवंडी परिसरातून समृद्धी महामार्ग सुरू होतो, त्याठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडी संदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा सुरू असताना प्रश्न उपस्थित केला. तसेच याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याबाबतचा विषय मांडला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.