'महायुतीकडून अपमान', आठवलेंकडून रागारागात पहिली उमेदवारी यादी जाहीर, ३९ जणांना संधी
मुंबई : खरा पंचनामा
भाजपने रात्री उशिरा केवळ ७ जागांचा प्रस्ताव दिला, परंतु ऐनवेळी नवीन ठिकाणी उमेदवार उभे करणे आता अशक्य आहे. मुंबईत आमची ताकद वंचित बहुजन आघाडीपेक्षा जास्त असूनही जागावाटपात आम्हाला डावलले गेले, त्यामुळे महाराष्ट्रभरातील आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, अशी खंत व्यक्त करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने ३९ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. इतर नेत्यांसारखे वारंवार शब्द फिरवणारे किंवा सोयीनुसार भूमिका बदलणारे आम्ही नाही. मुळात पक्ष, कार्यकर्ते आणि त्यांचा स्वाभिमान विसरून तडजोड करणे आम्हाला मान्य नाही, कारण कार्यकर्त्यांची ताकद हीच पक्षाची खरी ताकद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा मान आणि पक्षाचे अस्तित्व पणाला लावून आम्ही कोणतीही भूमिका घेणार नाही. आमचा शब्द आणि आमची निष्ठा पक्की आहे, अशा शब्दात आठवले यांनी महायुतीच्या नेत्यांना सुनावले.
व्यापक दृष्टीने विचार करता, आंबेडकरी समाजाची शक्ती सत्तेत सहभागी असणे आणि त्यामाध्यमातून जनसामान्यांची कामे अविरत चालू राहणे, हे अत्यंत गरजेचे आहे. हे गांभीर्य लक्षात घेऊनच आम्ही महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पुढील अनेक निर्णय घेता येतील, पण आता हे स्पष्ट आहे की, आम्ही ३८ ते ३९ जागांवर 'मैत्रीपूर्ण लढत' लढू. आमचा महायुतीला पाठिंबा कायम असला, तरी या जागांवर आरपीआय आपली ताकद दाखवून देईल.
महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत, मात्र आज जागावाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे, तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी काल दुपारी ४ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र मित्रपक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आले नाही. हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.