Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस निरीक्षकाला एक लाखाची लाच घेताना अटकदोन महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी केले होते कौतुक

पोलीस निरीक्षकाला एक लाखाची लाच घेताना अटक
दोन महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी केले होते कौतुक

यवतमाळ : खरा पंचनामा

यवतमाळ पोलिस दलातील अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे सुसज्ज इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ पोलिस दलाच्या 'ऑपरेशन प्रस्थान'चे कौतुक देखील केलं. अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमाला अवघे दोन महिने उलटत नाही तोच, पोलिस ठाण्यातील निरीक्षक नरेश रणधीर याला एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक केली. तक्रारदराकडून तब्बल तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता एक लाख रुपये घेताना पथकाने नरेश रणधीर याला अटक केली आहे.

पोलिस निरीक्षक नरेश रणधीर याने अडकलेल्या पैसे काढून देण्याच्या मोबदल्यात ही लाच मागितली होती. थेट पोलिस निरीक्षक लाचेच्या जाळ्यात अडकल्याने यवतमाळ पोलिस दलात खळबळ उडाली आहे. नरेश रमेशराव रणधीर (वय 52) हा मूळचा अंमळनेर (जि. जळगाव) इथला रहिवासी असून यवतमाळ इथं कार्यरत आहेत.

तक्रारदाराने आपल्या एका मित्राला दुसऱ्या मित्राकडून 10 लाख रुपये सहा महिन्यांसाठी मिळवून दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही संबंधित मित्राने पैसे परत केले नाहीत. याप्रकरणी तक्रारदाराने 10 डिसेंबरला अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात पोलिस निरीक्षक नरेश रणधीर यांनी 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अमरावती पथकाकडे तक्रार केली. पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यात नरेश रणधीर याने तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील आपल्याच दालनात लाचेचा पहिला हप्ता म्हणून, एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधच्या अमरावती पथकाने त्याला ताब्यात घेतले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.