जीएसटी अधीक्षकाला पाच लाखांची लाच घेताना अटक; घरात सापडली १९ लाखांची रोकड, ७२ लाखांची मालमत्ता
मुंबई : खरा पंचनामा
केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या मुंबई लेखापरिक्षण विभागातील अधीक्षकाला पाच लाख रूपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी २२ डिसेंबर रोजी रंगेहाथ अटक केली.
एका खासगी कंपनीला लागू झालेला वस्तू व सेवा कर आणि त्यावरील दंडाची रक्कम कमी करण्याच्या नावाखाली या अधीक्षकाने लाच मागीतली होती. वास्तविक ही रक्कम अनावश्यक असून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचा कंपनीचा दावा होता.
दक्षिण मुंबईत मुख्यालय असलेल्या एका खासगी कंपनीचे लेखापरिषण अधीक्षक अंकित अग्रवाल यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये केले होते. लेखा परिक्षणामध्ये खूप त्रुटी आहेत तसेच कंपनीने कर चुकवेगिरी केली आहे, असा दावा केला होता. वस्तू व सेवा कर कमी भरला असून त्यापोटी ९८ लाख रुपयांचा कर दंडासह अदा करण्यासाठी नोटीसही जारी केली होती. मात्र ही नोटीस कंपनीला मान्य नव्हती. त्यामुळे कंपनीने अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट घेतली. ही रक्कम आपण कमी करु शकतो. मात्र त्यासाठी २० लाख रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी मागणी केली.
अन्यथा एव्हढी रक्कम भरावीच लागेल. नाहीतर कंपनीवर कारवाई करु अशी धमकीही दिली. चर्चेनंतर लाचेची रक्कम तडजोडीनंतर १७ लाख रुपये निश्चित करण्यात आली. लाचेचा पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता सोमवारी आणून देण्यास सांगितले होते. सदर कंपनीच्या संचालकाने याबाबत सीबीआयकडे तक्रार दिली होती. त्यानुसार तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी सापळा रचला.
अधीक्षक अग्रवाल यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी कार्यालय तसेच निवासस्थानी झडती घेतली. या अधीक्षकाच्या मुंबईतील निवासस्थानी केलेल्या तपासणीत १८ लाख ३० हजार रुपयांची बेहिशेबी रोकड आढळली. याशिवाय एप्रिल २०२५ मध्ये खरेदी केलेली ४० लाख रुपये तसेच ३२ लाख रुपये किमतीच्या मुंबई महानगर परिसरात खरेदी केलेल्या दोन मालमत्तांची कागदपत्रे आढळली.
याबाबत सदर अधीक्षक समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे ही कागदपत्रे सीबीआयने ताब्यात घेतली आहेत. याशिवाय कार्यालयातील छाप्यात संबंधित कंपनीच्या लेखापरिक्षणाची डिजिटल प्रतही ताब्यात घेण्यात आली आहे. ही प्रत अग्रवाल यांच्या कार्यालयातील संगणकामध्ये आढळली आहे. ही अधिकृत आहे का, याची तपासणी केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.