Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"धुरंधर हा धोकादायक प्रचारपट आहे, कारण." युट्यूबर ध्रुव राठीची निरीक्षणे

"धुरंधर हा धोकादायक प्रचारपट आहे, कारण." 
युट्यूबर ध्रुव राठीची निरीक्षणे

मुंबई : खरा पंचनामा

युट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर ध्रुव राठी यांनी दिग्दर्शक आदित्य धर यांच्या धुरंधर या चित्रपटावर टीका करणारा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी धुरंधर हा केवळ चित्रपट नसून धोकादायक प्रचाराचा आणि खोटेपणाचा नमुना असल्याचा आरोप केला आहे.

ध्रुव राठी म्हणतात की, धुरंधर हा इतर वाईट प्रचारपटांपेक्षा जास्त धोकादायक आहे, कारण तो तांत्रिकदृष्ट्या उत्तम बनवलेला आहे. चांगल्या पद्धतीने तयार केलेला प्रचारपट लोकांवर अधिक प्रभाव टाकतो, आणि त्यामुळेच तो अधिक घातक ठरतो, असे त्यांचे मत आहे.

धुरंधरमध्ये वारंवार "खऱ्या घटनांवर आधारित" असल्याचा दावा केला जातो. चित्रपटात २६/११ मुंबई हल्ल्याचे खरे फुटेज, दहशतवाद्यांची फोन रेकॉर्डिंग्स आणि प्रत्यक्ष नावे वापरण्यात आली आहेत. यामुळे प्रेक्षकांना चित्रपटात दाखवलेले सगळे वास्तवच आहे, असा भास निर्माण होतो. पठाण, टायगरसारख्या स्पाय थ्रिलर चित्रपटांत असा वास्तवाचा दावा दिसत नव्हता, असेही राठी सांगतात.

ध्रुव राठीने असेही म्हटले आहे की, 'द ताज स्टोरी' किंवा 'द बंगाल फाइल्स' हे चित्रपट धोकादायक वाटले नाहीत, कारण ते मुळातच कमजोर होते. मात्र धुरंधर आकर्षक असल्यामुळे लोक त्यावर सहज विश्वास ठेवू शकतात.

चित्रपट केवळ मनोरंजन म्हणून पाहावा, असा युक्तिवाद करणाऱ्यांनाही ध्रुव राठीने आपल्या व्हिडीओतून टोला लगावला आहे. त्यांच्या मते, मनोरंजनाच्या नावाखाली असत्य पसरवणे अधिक गंभीर बाब आहे.

दरम्यान, ध्रुव राठीच्या या टीकेवर अद्याप दिग्दर्शक आदित्य धर यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. १४ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या धुरंधर या भारत-पाकिस्तान पार्श्वभूमीवरील गुप्तहेर थ्रिलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रणवीर सिंगच्या अभिनयासह दिग्दर्शन आणि संगीताचेही कौतुक होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे एकूण बजेट सुमारे २८० कोटी रुपये असून, तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.