Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दुसरा धक्का; पुण्याच्या अध्यक्षांनंतर मुंबई अध्यक्ष राखी जाधव पक्ष सोडणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दुसरा धक्का; पुण्याच्या अध्यक्षांनंतर मुंबई अध्यक्ष राखी जाधव पक्ष सोडणार?

मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने मुंबईत ठाकरे बंधूच्या युतीशी आघाडी केल्यानंतर जागावाटपात काही वॉर्डावर पाणी सोडावे लागणार असल्यामुळे राखी जाधव नाराज झाल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत त्यांनी भूमिका जाहीर केलेली नाही. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही शरद पवारांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राखी जाधव यांची बातमी खरी ठरल्यास पक्षाला हा दुसरा धक्का असेल.

राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर विरोधकांनी आरोप आणि ईडीने त्यांची अटक केल्यानंतर त्यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राखी जाधव यांची मुंबई अध्यक्षपदी वर्णी लागली होती. पक्षाचे दोन गट पडल्यानंतरही त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नव्हती. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नसतानाही राखी जाधव गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची खिंड मुंबईत लढवत होत्या.

दोन दिवसांपूर्वी राखी जाधव यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत असताना आपली भूमिका मांडली होती. त्या म्हणाल्या, "मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीतून लढल्या जाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. पण आमच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागा आम्हाला मिळणे अपेक्षित आहे. तसेच आमचे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत, ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या वॉर्डात पक्षसंघटना वाढवली आहे. या उमेदवारांना पण उमेदवारी मिळाली पाहिजे, असाही आमचा प्रयत्न होता."

"ठाकरे बंधूंच्या आघाडीत आम्हाला सन्मानजनक वागणूक नक्कीच मिळत आहे. पण सन्मानजनक जागा मिळत नाही आहेत. मुंबईतील २२७ वॉर्डापैकी आम्ही केवळ १५ ते २० जागा मागत आहोत. इतक्या जागा मिळणे अपेक्षित आहेत. यात आमचे विद्यमान नगरसेवक आहेत. काँग्रेसशीही आमची चर्चा सुरू आहे. आम्हाला ज्या जागा हव्या आहेत, त्या मिळाल्या तर आम्ही पुढे जाऊ शकतो. पण शिवसेना किंवा काँग्रेसने त्यावर उत्तर देणे अपेक्षित आहे", अशी प्रतिक्रिया राखी जाधव यांनी दिली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.