राज्यात ४४८ निरीक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील विविध पोलीस संवर्गातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील ४४८ निरीक्षकांची यादी केली आहे.
डिसेंबरमध्ये कारकीर्दीची तपासणी झाल्यानंतर नववर्षात पात्र निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळू शकते. तर नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी निलंबित व सहसंशयित पोलीस निरीक्षक अशोक गिरी याचेही नाव यादीत आहे.
सन २०२५-२६ च्या सेवाज्येष्ठता सूचीनुसार अंतिम निवडसूची तयार करून पदोन्नती देण्यात येणार आहे. विचारकक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांची कारकीर्द, प्रलंबित प्रकरणे, खात्यांतर्गत चौकशी किंवा कारवाई यासह विविध स्वरुपाच्या कामकाजाची व सेवापुस्तिकेची पडताळणी डिसेंबर महिन्यात होईल.
त्यानुसार १५ डिसेंबर रोजी नागपूर, गडचिरोली, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नाशिक, कोकण परिक्षेत्रासह सर्व लोहमार्ग, १६ डिसेंबर रोजी कोल्हापूर परिक्षेत्र, गुन्हे अन्वेषण विभाग, सर्व जिल्हा समाजकल्याण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुप्तावार्ता विभागासह सर्व पोलीस प्रशिक्षण विद्यालये, १७ डिसेंबर रोजी सर्व पोलीस आयुक्तालयांमधील अधिकारी महासंचालक कार्यालयात हजर राहतील. दरम्यान, ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांपैकी पात्र निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले जातील.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.