HSRP नंबरप्लेटसाठी 50 रुपये अतिरिक्त शुल्क घेणं भोवलं, थेट फिटमेट केंद्रालाच टाळं ठोकलं
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावण्यासाठी जास्त पैसे आकारणाऱ्या मिरा-भाईंदरमधील मिश्रा मीटर्स सेंटरवर परिवहन आयुक्तालयाने कारवाई केली आहे. केंद्रावर 'एचएसआरपी' बसवण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली असून केंद्र बंद करण्यात आले आहे. राज्यात अद्याप एक कोटीहून अधिक जुनी वाहने 'एचएसआरपी'च्या प्रतीक्षेत आहेत.
सन २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात 'एचएसआरपी' बसवण्यासाठी परिवहन विभागाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र अनेक वाहन चालकांकडून फिटमेंट केंद्रावर जास्त रकमेची मागणी केल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार परिवहन विभागाने तपासणी सुरू केली आहे.
मिरा-भाईंदरमध्ये मिश्रा फिटमेंट केंद्रावर ५० रुपये अतिरिक्त आकारणी करत असल्याची तक्रार परिवहन आयुक्तालयाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार केंद्रावर प्रत्यक्ष पाहणी केल्यावर तक्रारीत तथ्य दिसून आले. संबंधित फिटमेंट केंद्रावरून 'एचएसआरपी' बसवण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली असून त्याचे केंद्र बंद करण्यात आले आहे. अधिक रक्कम आकारणाऱ्या राज्यातील तीन केंद्रांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात अडीच हजारांवर फिटमेंट केंद्रे कार्यान्वित आहेत, असे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या राज्यातील ७७.७ लाख वाहनांना 'एचएसआरपी' बसवण्यात आली आहे. अपघातग्रस्त, गुन्ह्यात जमा झालेल्या, भंगारात काढलेल्या गाड्यांच्या 'एचएसआरपी'बाबत स्पष्ट तरतूद नाही.
'एचएसआरपी'साठी अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाइन आरक्षण करावे, केंद्रावर जादा रकमेची मागणी केल्यास तातडीने जवळच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे आवाहन परिवहन आयुक्तालयाने केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.