अंबरनाथचा वचपा भाजपने सोलापूरमध्ये काढला
मतदानाच्या 3 दिवस आधी राष्ट्रवादीचा उमेदवारच पळवला
सोलापूर : खरा पंचनामा
सोलापूरच्या राजकरणात गेल्या महिनाभरापासून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. सोलापूरमध्ये इतर पक्षाच्या अनेक मातब्बर नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने सोलापूरमध्ये उमेदवारी जाहीर केलेल्या यादीत अनेक उमेदवार हे मूळ भाजपचे नाहीत मात्र मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने ऐनवेळी मोठी खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या अधिकृत उमेदवारालाच आपल्या गोटात घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक ९ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत तुषार जक्का यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 9 ड मधील निवडणुकीचे गणित पूर्णपणे बदलले आहे या प्रभागात भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत होणार होती. मात्र राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारानेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही लढत आता एकतर्फी होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
तुषार जक्का यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे कारण सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रचाराला कोणी वेळ देत नव्हते. एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नेता आपल्या प्रचारात सहभागी नव्हता, त्यामुळे कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचा आरोप त्यांनी पक्षावर केला आहे. तर पक्षाने तुषार जक्का यांचे आरोप फेटाळले असून तुषार जक्का यांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले. त्यामुळेच त्यांनी ऐनवेळी उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.