Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उद्या सायंकाळपासून प्रचारबंदी; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय !

उद्या सायंकाळपासून प्रचारबंदी; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय !

मुंबई : खरा पंचनामा

महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपत असल्याने, त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या निवडणूकविषयक जाहिराती इलेक्ट्रॉनिक, मुद्रित अथवा अन्य कोणत्याही प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी स्पष्ट माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

प्रचार समाप्तीनंतर सर्व माध्यमांवरील निवडणूक जाहिरातींवर पूर्ण बंदी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नोंदणीकृत व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार मतदानाच्या ४८ तास आधी म्हणजेच १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपते. त्यामुळे या वेळेनंतर कोणत्याही माध्यमांतून जाहिराती प्रसिद्ध करण्यास किंवा प्रसारित करण्यास परवानगी राहणार नाही. जाहीर प्रचार संपल्यानंतर मुद्रित माध्यमांतील जाहिरातींसाठी पूर्वप्रमाणन किंवा परवानगी घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असेही त्यांनी नमूद केले. यासंदर्भातील सविस्तर नियम व अटी राज्य निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या 'निवडणूक प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५' मध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत.

यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी स्पष्ट केले की, इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मात्र सूचक आणि अनुमोदक यांची नावे उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे, त्याच प्रभागातील मतदार यादीत असणे बंधनकारक आहे. पक्षाच्या उमेदवारास तसेच अपक्ष उमेदवारास प्रत्येकी एक सूचक आणि एक अनुमोदक आवश्यक असतो. एखादा उमेदवार एकापेक्षा अधिक प्रभागातून नामनिर्देशनपत्र दाखल करू शकतो, मात्र निवडणूक मात्र एका प्रभागातील एकाच जागेसाठी लढविता येईल. तसेच एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.