भाजपच्या कार्यकर्त्यांकडून '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा
मुंबई : खरा पंचनामा
छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजप आणि शिंदे सेनेची युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. यानंतर आता मुंबईतही एकत्र निवडणूक लढवणाऱ्या या दोन्ही पक्षांमध्ये फूट पाडणारी एक घटना घडली.
शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने येताना दिसले. याठिकाणी भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिवसेनेच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे. आज सकाळी या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सुरु असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी माईकवरुन '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा दिल्या. आतापर्यंत ठाकरे गट '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा देऊन शिंदे गटाला डिवचत होता. मात्र, आपल्या मित्रपक्षानेच अशा घोषणा दिल्याने साहजिकच शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतापले. त्यांनीही भाजपविरोधात घोषणा दिल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईत भाजप आणि शिंदे गटात झालेल्या या भांडणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिवसेना-भाजपच्या जागावाटपात वॉर्ड क्रमांक 173 हा शिंदे सेनेला सुटला होता. त्यामुळे शिंदे सेनेने येथून पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र, पूजा केळुस्कर यांनीही भाजपचा कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज भरला होता. विशेष म्हणजे त्यांचा अर्ज वैधही ठरला होता. त्यामुळे शिंदे गटाने वॉर्ड क्रमांक 173 मध्ये नाईलाजाने मैत्रीपूर्ण लढतीला होकार दिला होता. मात्र, आता प्रचार सुरु झाल्यानंतर या वॉर्डमध्ये दोस्तीत कुस्ती होण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते या वादावर कसा तोडगा काढणार, हे बघावे लागेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.