मला ऑफर आल्या, मी पळवून लावल्या!
राज ठाकरेंचा 53 उमेदवारांना कानमंत्र
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व 53 उमेदवारांना थेट कानमंत्र देत निवडणूक रणधुमाळीला धार दिली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील युतीत मनसेच्या वाट्याला 53 जागा आलेल्या आहेत. आज 53 उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी उमेदवारांना तीन महत्त्वाचे सल्ले देत, 'मुंबई मराठी माणसाची आहे. ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे. आता पराक्रमाची पराकाष्ठा करा,' असा स्पष्ट संदेश दिला आहे.
राज ठाकरे यांनी उमेदवारांशी बोलताना म्हटले की, 'तुम्हाला अनेक ऑफर येतील. पैशांची आमिष दाखवली जातील. मात्र कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.' स्वतःचा अनुभव सांगताना त्यांनी म्हटले, 'मलाही खूप ऑफर आल्या होत्या, पण मी सगळ्यांना पळवून लावलं,' असे स्पष्ट शब्दांत त्यांनी उमेदवारांना बजावले.
मुंबई मराठी माणसाची आहे. आपल्याकडे ही शेवटची संधी आहे. प्रत्येक बूथला आपली 10 लोकं उभी करा. बोगस मतदान झाले नाही पाहिजे, यासाठी तुम्ही सतर्क राहा. जर बोगस मतदार सापडला तर तिथेच फटकावून काढा, असा देखील राज ठाकरे यांनी उमेदवारांना दिला आहे. राज ठाकरे यांच्या या थेट आणि आक्रमक मार्गदर्शनामुळे मनसेच्या उमेदवारांमध्ये नवचैतन्य संचारले असून, महापालिका निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.