सातारा एलसीबीचा कोण होणार कारभारी! घोडके की भुजबळ?
राजकीय नेत्यांमध्येच चुरस
संभाजी पुरीगोसावी
सातारा : खरा पंचनामा
सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी पदासाठी आता नव्या निरीक्षकांची नियुक्ती ही अत्यंत संवेदनशील बनली आहे. हा विषय थेट आता मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. सध्या या पदासाठी चुरस असून लवकरच नवीन कारभाऱ्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. पोलीस दलातील वरिष्ठांच्या विचाराधींन असलेल्या नावांपैकी अंतिम निर्णय मुख्यमंत्री कार्यालयातून घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) निरीक्षक अरुण देवकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर एलसीबीचा नवा कारभारी आपलाच हवा, यासाठी भाजपच्या जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. सातारचा एलसीबी निरीक्षकांच्या नियुक्तीचा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने पोलीस अधीक्षकांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे एलसीबीचा नवा कारभारी कोण याची उत्सुकता लागून राहिली आहे.
एलसीबीचे निरीक्षकपद जिल्हा पोलीस दलातील महत्त्वाचे पद आहे. जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याचे काम या विभागाकडून होते. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाची कामाची गुणवत्ता या विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. जिल्ह्यातील अवैध धंदे असो, किंवा अन्य कोणतीही अडचण असल्यास या विभागाला कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत हस्तक्षेप करता येतो. त्यामुळे पहिल्यापासून एलसीबीचा निरीक्षक म्हणून बसण्यासाठी पोलीस दलात चुरस नेहमीच दिसून येते. त्यातही हा विभाग चांगल्या पद्धतीने हाताळता येईल अशी गुणवत्ता पाहूनच अधिकाऱ्याची निवड केली जाते.
एलसीबीचे सध्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या पदावर आता आपल्या मर्जींतला किंवा आपण सुचवलेला अधिकारी बसावा यासाठी नेत्यांमध्ये फिल्डिंग लावण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहे. आणि त्यातच पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि सध्या जिल्हा विशेष शाखेत असलेले पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्यामध्ये चांगलीच चुरस दिसून येत आहे. घोडकेंसाठी मुख्यालयाच्या ठिकाणचा नेता आग्रही आहे. तर भुजबळांसाठी पूर्व भागातील नेता आग्रही आहे त्यामध्ये कोणाची सरशी होणार हे लवकरच समजेल. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या नेत्यांवर जिल्ह्यातील प्रशासन व कायदा, सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असते. त्यामुळे पालकमंत्री बोले दल हले, अशीच स्थिती सर्वंत्र पाहायला मिळत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.