कानाखाली मारल्याच्या रागातून केला चैतन्यचा गेम
एकजण ताब्यात, तिघेजण पसार
सांगली : खरा पंचनामा
कानाखाली मारल्याच्या रागातून रेकॉर्डवरील गुन्हेगार चैतन्य अप्पासाहेब तांदळे (वय १८, रा. रामनगर, सांगली) याचा धारदार चाकू, कुकरीने वार करत शुक्रवारी रात्री चौघानी खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मुख्य संशयितसह तिघेजण पसार झाले आहेत. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संशयित सुजल ऊर्फ पाप्या वाघमोडे त्याचा भाऊ शुभम चंद्रकांत वाघमोडे, राहुल जाधव (तिघे रा. महादेव कॉलनी, शामरावनगर), सुजलचा मामा विनोद डांगे (रा. सांगली) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. विनोद डांगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहर पोलिसांची पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. मृत चैतन्य हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गतवर्षी कर्नाळ येथे तरुणाचा खून झाला होता. तेव्हा अल्पवयीन असलेल्या चेतनविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये तो जामिनावर मुक्त झाला होता. त्यानंतर तो सेंट्रिंगचे काम करत होता. रामनगर येथे तो आई-वडील, आजी, भाऊ चंद्रकांत यांच्यासमवेत राहात होता.
शुक्रवारी रात्री चैतन्य आणि त्याचा मित्र हर्षवर्धन गायकवाड हे दोघेजण वरद कॉलनी, शामरावनगर येथे दाबेली खाण्यासाठी थांबले होते. तेव्हा सुजल आणि त्याचा मामा विनोद डांगे येथे दुचाकीवरून आले. सुजल हा सतत जॅकेटमध्ये हात घालत होता. त्यामुळे चैतन्य याने त्याच्याजवळ जाऊन त्याचे जॅकेट तपासले तेव्हा त्याच्या कमरेला चाकू असल्याचे आढळले. ‘चाकू घेऊन का फिरतोस’ म्हणून चेतन याने त्याच्या कानाखाली चापट मारली. तेव्हा सुजल व विनोद तेथून निघून गेले. त्यानंतर चेतन व हर्षवर्धन दुचाकीवरून जात असताना सुजलचा भाऊ शुभम वाघमोडे याने त्याला थांबवले. ‘तू सुजलला का मारलेस’ म्हणून जाब विचारला. दोघांमध्ये वाद सुरू असताना सुजल, विनोद, राहुल जाधव तेथे आले. त्यांनी चैतन्यवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. हर्षवर्धन याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला न जुमानता हल्ला केला. गर्दी जमल्यानंतर चौघेजण दुचाकीवरून पळाले. चेतनच्या गळ्यात घुसलेला चाकू तसाच होता. डोक्यात, पोटावर, गळ्यात वर्मी वार झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही माहिती समजताच चेतनचा भाऊ चंद्रकांत घटनास्थळी आला. त्याने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयित विनोद डांगे याला ताब्यात घेतले आहे. इतर तिघांचा शोध सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक संदीप भागवत, निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्या नेतृत्वाखाली पथके रवाना करण्यात आली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.