महापालिकेत बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा!
'कायद्यातच 'बिनविरोध'ची तरतूद असल्याचं निवडणूक आयुक्तांनी केलं स्पष्ट
मुंबई : खरा पंचनामा
राज्यभरातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, महापालिका निवडणुकीपूर्वीच 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली आहे.
निवडणूक आयोगावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचंही विरोधकांकडून बोललं जातं. तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील गोंधळ, बिनविरोध निवड तसेच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांमुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
मात्र, निवडणूक आयोग नियमानुसार काम करीत असून, आयोगावर कुठलाही दबाव नसल्याचे राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी एका दैनिकाशी बोलताना स्पष्ट केलं. आयोगावर राजकीय दबाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर बोलताना दिनेश वाघमारे म्हणाले की, माझ्यावर कुठलाही प्रकारचा राजकीय दबाव नाही.
शिवाय याचवेळी त्यांना बिनविरोध निवडणुकीबाबत आयोगाची काय प्रक्रिया नेमकी काय असते हे विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'कायद्यातच बिनविरोध निवडणुकीची तरतूद आहे. मात्र एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यास, अर्ज मागे घेतलेल्या इतर उमेदवारांना प्रलोभन, धमक्या मिळाल्यात का किंवा त्यांनी पोलिस तक्रार केली आहे का? याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाकडून अहवाल मागवतो.
आतापर्यंत आलेल्या अहवालात संबंधित उमेदवारांनी स्वतः अर्ज मागे घेतल्याचे स्पष्ट झाले असून अहवालातून खात्री पटल्यावर आम्ही बिनविरोध निवडणूकीला मान्यता देतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. 'बिनविरोध'मुळे मतदारांचा हक्क डावलला जातोय या आरोपांवर ते म्हणाले, "बिनविरोध निवडणुकीची तरतूद महापालिका अधिनियमातच आहे. कायदे आम्ही तयार करत नाही, तर कायदेमंडळ करते. आयोग या कायद्यांना बांधील आहे. बिनविरोध निवडून येण्याची प्रक्रीया रद्द करायची असेल, तर कायद्यामध्ये सुधारणा करावा लागेल. ते आमच्या हाती नाही. शिवाय बिनविरोध निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
न्यायालयाने अद्याप यासंदर्भात कुठलेही निर्देश दिले नाही. त्यामुळे तोपर्यंत कायद्यातील तरतुदीनुसार आम्हाला त्याचे पालन करावे लागणार असल्याचं राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ज्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्याविरोधात पोलिस तक्रार नसल्यास ती निवड ग्राह्य मानली जाणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.