निवडणुकीला गालबोट, शिवसेना-भाजपामध्ये तुफान राडा
भाजपच्या नेत्यावर कोयत्याने वार
ठाणे : खरा पंचनामा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला असतानाच, डोंबिवलीत एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक २९ मध्ये मध्यरात्री शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.
साध्या बाचाबाचीपासून सुरू झालेला हा वाद थेट खुनी हल्ल्यापर्यंत पोहोचला. इथं भाजपच्या एका नेत्यावर भररस्त्यात कोयत्याने वार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
कल्याण डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २९ हा आधीपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. सोमवारी भाजपच्या पत्रकांमधून पैसे वाटप केल्याचा आरोप या प्रभागात झाला होता. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री १० वाजेनंतर भाजपचे कार्यकर्ते मीटिंग घेत असल्याची माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. "रात्री १० नंतर आचारसंहिता असताना भाजपची मीटिंग कशी काय सुरू आहे?" असा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते तिथे पोहोचले.
सुरुवातीला दोन्ही गटात शाब्दिक चकमक घडली आणि पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यावर थेट कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात भाजपचे पदाधिकारी ओमनाथ नाटेकर हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच भाजपचे ३ आणि शिवसेनेचे २ कार्यकर्ते देखील जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपची युती आहे. असं असलं तरी प्रभाग क्रमांक २९ मध्ये मात्र दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या प्रकारामुळे युतीमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या इथं तणावपूर्ण शांतता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.