सांगलीत आगीत होरपळून कर्नाटकातील महिलेचा संशयास्पद मृत्यू
पती पसार झाल्याने गूढ वाढले
सांगली : खरा पंचनामा
शहरातील शंभर फुटी ते धामणी रस्त्यावरील शांतीबन चौकातील नर्सरीमधील शेडवजा घराला लागलेल्या आगीत कर्नाटकातील एका विवाहित महिलेचा होरपळून संशयास्पदरित्या मृत्यू झाला. घटनेनंतर तिचा पती पसार झाल्याने या घटनेचे गूढ वाढले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.
निकिता शिव मनगुळे (वय २५, मूळ रा. कागवाड, बसवनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. शिव मनगुळे असे तिच्या पतीचे नाव आहे. शंभर फुटी रस्त्यावरील शांतीबन चौकातील नर्सरीत सात-आठ महिन्यापूर्वी शिव आणि निकिता मनगुळे हे कर्नाटकातील दांपत्य कामासाठी आले होते. नर्सरीतील पत्र्याच्या शेडवजा घरात ते राहत होते. दोघांचे लग्न होऊन दोन वर्षे उलटली होती. परंतू त्यांना मूलबाळ नव्हते. या कारणावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. सांगलीत नर्सरीतील शेडवजा घरात राहताना देखील त्यांच्यात सतत भांडणे सुरूच होती.
शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ते राहत असलेल्या घराला भीषण आग लागली. धुराचे मोठे लोट येऊ लागले. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. नागरिकांनी अग्निशमन दलास कळवल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विश्रामबाग पोलिसही तत्काळ दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्काळ आग आटोक्यात आणली. तेव्हा घराला बाहेरून कडी लावून पती गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे घातपाताचा संशय बळावला आहे.
विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तत्काळ दोन पथकांना पती शिव मनगुळे याच्या शोधासाठी रवाना केले. विजयपूर परिसरात पथकाने शनिवारी दिवसभर शोध घेतला. प्राथमिक तपासात हा घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे. पतीच्या अटकेनंतर त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो असे पोलिसांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.