पोलीस ठाण्यात न येता ऑनलाईन तक्रार दाखल करण्यास नागरिकांनी प्राधान्य द्यावे
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे इचलकरंजीत आवाहन
इचलकरंजी : खरा पंचनामा
तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्याऐवजी ऑनलाईन तक्रार करण्यासंदर्भातील नवीन कायदा अमलात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी परीक्षेत्रातील सर्वच पोलीस ठाण्याना जनतेच्या प्रबोधनासाठी सुचना केल्या आहेत, अशी माहिती कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुका शांतेतत व निर्भीड वातावरणात पार पडल्या. त्याप्रमाणे जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी हे इचलकरंजीतील पोलीस ठाण्याच्या वार्षिक परीक्षणासाठी साठी आले होते. त्यावेळी येथील पोलिस उपाधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
महानिरीक्षक फुलारी म्हणाले, गुन्हेगारीच्या प्रमाणात घट होत चालली आहे. त्याचबरोबर पोलीस विभागाकडुनही कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर कारवाई तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार्यांवर प्रतिबंधात्मक, हद्दपारीची कारवाई सातत्याने करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन केल्यामुळे किरकोळ अपवाद वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस तपासाला गती येण्यासाठी नवनविन तांत्रिक बाबींचा अवलंब करण्यात येत आहे. त्यामध्ये आता ऑनलाईन तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असुन संबंधित पोलीस ठाण्याकडे त्या तक्रारी वर्ग करता येणार आहेत. त्यामुळे तक्रारदाराचा वेळ व पैसा वाचणार आहे.
इचलकरंजी दौऱ्यात त्यांनी नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना नवीन कायद्याविषयी माहिती दिली.
कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी महानिरीक्षक फुलारी यांचे स्वागत केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्यासह शिवाजीनगर, गावभाग, शहापुर पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.